वाचनीय

# Blog.. Blog #रामदेवबाबांची खिल्ली उडवून कुणी काय मिळविले?

ताज्या घडामोडी, ब्लॉग
April 27, 2021

जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे रोज हजारो मृत्यू होत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य सेवेतील सर्व डॉक्टर नर्सेस व इतर असे सर्वजण अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोनाचे नियम न पाळल्याने म्हणा की अजून इतर कारणांमुळे रूग्ण संख्या वाढीचा दर हा अवाक्याबाहेर जात आहे.

कोरोनावरील उपचाराबाबत भारतात अॅलोेपॅथीवरच भर देण्यात आला आहे. मात्र काही देशांमध्ये अॅलोपथीसह होमिओपॅथी व आयुर्वेद या तीघांवर लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासह आरोग्य सेवेतील कर्मचा-यांवर ताण येण्यासह औषधे, बेड, ऑक्सिजन यांची कमतरता भासत नाही.

या सर्व बाबीचा उहापोह केला आहे औरगाबादचे ज्येष्ट पत्रकार दत्ता जोशी यांनी… काय सांगताहेत ते वाचाच या ब्लॉगमधून…

कोरोना सुरू झाला तेव्हा औरंगाबादेतील डॉ. आकाश अबोटी यांची एक बातमी काही ठिकाणी प्रसिद्ध व्हावी या साठी मी प्रयत्न केले होते. श्री. अबोटी बराच काळ चीनमध्ये राहिलेले आहेत आणि कोविड नियंत्रणाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या सूचनांच्या आधारे पहिल्या लाटेत मुंबईतील धारावी झोपडपट्टीत नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते.

चीन व अन्य काही देशांत कोवीडशी झुंजताना तेथील पारंपरिक पॅथी आणि अ‍ॅलोपथी यांची संमिश्र औषध योजना केली जात आहे. असे अनेक देशांत घडलेले आहे. यावर डाॅ. अबाेटी यांनी लक्ष वेधले हाेते. आपल्याकडे भारतात मात्र सुरुवातीपासून केवळ आणि केवळ अ‍ॅलोपथीवरच भर दिला गेला. आयुर्वेद, होमिओपथी आदी प्रभावी औषधोपचार योजनांना केवळ दुर्लक्षितच नव्हे तर त्याज्य समजले गेले. सुरुवातीचे काही महिने तर अशा डॉक्टरांच्या प्रॅक्टीस करण्यावरही बंदी होती.

केंद्रात कोण आहे आणि राज्यात काय केले जात आहे, त्यांनी काय करायला हवे होते, या चर्चेत मला स्वारस्य नाही. मुद्दा इतकाच आहे की शेकडो वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या आयुर्वेदाद्वारे आणि प्रभावी असलेल्या होमिओपथीद्वारे कोरोनाला नियंत्रित करणे शक्य होते का?

उत्तर आहे – होय.कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा सारेच जण अंधारात चाचपडत होते पण पहिल्या काही महिन्यांतच हा विषय ज्याच्या त्याच्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे, हे सिद्ध झाले. एकाच घरातील अशी उदाहरणे समोर आली. एकसमान औषधयोजना असूनही एक जण बळी पडला आणि दुसरा बचावला.

कोरोनाचा विषाणू नेमका कोणत्या प्रकारचा हल्ला करतो, हे लक्षात आल्यानंतर अनेक औषध निर्मात्यांनी त्यावर काम सुरू केले. या विषयात बाबा रामदेव यांचे नाव ठळकपणाने समोर येते. त्यांनी त्यांच्या ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ला शोभेल अशा प्रकारे आक्रमकपणे ‘कोरोनील’ बाजारात आणले.

(त्यावर अनिल देशमुख यांच्यासारख्या पूर्वग्रही नेत्याने बंदीची घोषणा केली. वास्तविक, ही बंदी एकवेळ आरोग्यमंत्र्यांनी आणली असती तर समजू शकले असते. देशमुखांचा यामागील इंटरेस्ट आता कदाचित सीबीआय कोठडीत समोर येईल सुद्धा!)

बाबा रामदेव आणि कोरोनीलवर अनेक जण अक्षरशः तुटून पडले. अर्थात, हा सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्याच घटकपदार्थांवर आधारित औषधी श्री श्री रविशंकर यांच्या ‘श्रीवेदा सत्व’ने बाजारात आणली, हळद, गिलोय, विविध प्रकारची वनौषधी यांच्यापासून बनलेली कबसूर कुडीनीर, अमृत आणि टर्मरिक प्लस या तीन गोळ्या आणि तुलसी अर्क व शक्ती ड्रॉप या द्रवांच्या साह्याने पाच औषधांचे हे कीट श्री श्री यांच्या माध्यमातून आलेले आहे.

बाबा रामदेव यांच्या कीटमध्ये साधारणपणे हीच औषधी आहे. श्री श्रींच्या या औषधीवर मात्र कुणी आक्षेप घेतला नाही!आजवरचा साधारण अनुभव असा आहे, की या औषधींच्या नियमित सेवनामुळे लोकांची प्रतिकारशक्ती सुधारली आहे. अनेकांना संसर्गात जाऊनही कोरोनाची लागण झाली नाही किंवा ज्यांना झाली, त्यांना सौम्य लक्षणांवर निभावले गेले. अर्थात, काल औषध घेतले आणि आज परिणाम झाला, असे घडलेले नाही.

ही औषधी सातत्याने घ्यावी लागते. व्यायाम जसा एक दिवस करून चालत नाही, त्यातील सातत्य महत्वाचे, तसेच हे आहे.होमिओपथीमध्येही यावर प्रभावी औषधयोजना तज्ज्ञांनी प्रयत्नपूर्वक तयार केलेली आहे. मूळ अंबाजोगाईचे आणि पाँडिचेरीतील अरबिंदो आश्रमात सेवा देणारे विख्यात होमियो तज्ज्ञ डॉ. पाचेगावकर यांचा या विषयातील अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. त्यांनी संशोधित केलेली औषध योजना त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचली आहे. ते सारे कोरोनातून बिनबोभाट बरेही होत आहेत.

अर्थात आयुर्वेद असो की होमिओपथी, ही औषधी घेणारा रुग्ण स्वतःच्या खुशीने, अत्यंत विश्वासाने ती घेतो आहे आणि कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवतो आहे. परभणीतील माझे मित्र श्रीकृष्ण उमरीकर Shrikrishna Umrikar यांनी स्वतःला, पत्नीला आणि आईवडिलांना केवळ आणि केवळ आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून कोरोनातून बाहेर काढले. डॉ. गिरीष वेलणकर यांची औषधोपचार योजना त्यांनी तंतोतंत अंगीकारली आणि बेडपरणे या संसर्गाला सामोरे जात त्यावर विजय मिळविला.

कोणतीही औषधी घेताना त्यावर असलेला रुग्णाचा विश्वास त्याच्या बरे होण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो.कोरोना हे जागतिक षडयंत्र वगैरे आहे, हे मानायला मीही तयार नाही. ते जागतिक संकट आहे आणि त्यातून अपरिमित प्राणहानी होते आहे, हे सत्य आहेच. पण त्यानंतरचा टप्पा घातक आहे. प्रत्येक पक्ष, आय रिपीट – प्रत्येक पक्ष त्यावर पोळी भाजतो आहे. हॉस्पिटल्सच्या चेन त्यात गुंतल्या आहेत.

अनेक मंत्र्यांनी राज्यभरातील अशा हॉस्पिटल्समध्ये ‘गुंतवणूक’ केलेली आहे आणि त्याचे रिटर्न गोळा करण्यासाठी ते जिल्ह्याजिल्ह्यांचे दौरे करीत आहेत, असे खात्रीपूर्वक सांगितले जात आहे.

हे अमानवी क्रूर खेळ सत्तेच्या आडून खेळले जात आहेत आणि सामान्य माणूस मात्र त्याला बळी पडत आहे. लुटीच्या तंत्राचे आणखी एक उदाहरण देतो.

नाशिकमधील आमचे आयटी क्षेत्रातील एक मित्र आहेत. पियुष सोमाणी हे त्यांचे नाव. ‘ईएसडीएस’ हे त्यांच्या कंपनीचे नाव. देश-परदेशात त्यांचे क्लायंट आहेत.

मागील वर्षी कोरोना आला, तेव्हा त्यांनी आपल्या आयटी ज्ञानाचा उपयोग करून एक सॉफ्टवेअर विकसित केले. ‘चेस्ट एक्सरे’ फीड केला, की कोरोनाची लागण किती प्रमाणात आहे आणि तो कुठल्या स्टेजला पोहोचला आहे याचे निदान पाच मिनिटांत होत असे. त्यात 99 टक्के अचूकताही होती. पण ते संशोधन मागे सारण्यात आले.

फुकटचे सॉफ्टवेअर आणि 200 रुपयांचा एक्सरे यात कोरोनाचे उपचार कसे काय करायचे? आम्हाला करोडो कमवायचे आहेत ना…! मग सीटी स्कॅनची सक्ती सुरू झाली. तेथे पाच-दहा हजारांचे बिल काढता येते. गंमत अशी, की 95 टक्क्यांहून अधिक केसेसमध्ये कोरोनाची बाधा ठरविण्यासाठी एक्सरे पुरेसा असतो. पण तो लुटारू डॉक्टरांच्या भुकेला पुरत नाही…! तेथे सीटी स्कॅनच करणे भाग पाडले जाते. अशी ही स्थिती.

या पार्श्वभूमीवर, सरकारने बाकी काही करू नये, पण किमान आयुर्वेद आणि होमिओपथीला अडवू तर नये. नाहीतरी सध्या सगळे रामभरोसे चालत आहे. कुठे हॉस्पिटल जळत आहेत, कुठे ऑक्सिजन लीक होतोय, कुठे सॅनिटायझर पाजले जात आहे. यंत्रणा बेमुर्वतखोर झाली आहे. सगळ्यांना यात फक्त पैसा दिसतो आहे.

अनेक डॉक्टरांनी या काळात कोट्यवधींची कर्जे नील केलेली आहेत. अशा स्थितीत, नाहीतरी तुम्ही सामान्य माणसाला त्याच्या नशिबावर सोडलेच आहे, तर आयुर्वेद आणि होमियो प्रॅक्टिशनरना अडवणे सोडा. त्यांना त्यांच्या पद्धतीने जबाबदारीने उपचार करू द्या. सामान्य आरोग्य सेवेवरील तेवढा ताण कमी होईल आणि त्यातूनही जे गंभीर झाले अशा मोजक्या लोकांसाठी अन्य रुग्णालये आणि कोविड सेंटर उपलब्ध करून देता येतील.

यात अडचण एकच आहे, ज्या प्रमाणे वाझे – लॉबीतून मासिक हप्त्यांची टार्गेट ठरवून त्यावर वसुलीचे एजंट नेमलेले असतात आणि त्यातून हजारो कोटींची कमाई होत असते तोच प्रकार आरोग्य लॉबीतही चाललेला आहे. त्यांचा धंदा यामुळे कमी होणार आहे. संबंधितांनी आता एवढी मोठी कमाई झाल्यानंतर जनतेवर कृपा करण्याचे ठरविले तर अनेकांचा जीव वाचणे सोपे होणार आहे…

साभार : दत्ता जोशी, ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts