वाचनीय

स्वाध्याय परिवारातील वादामुळे श्रीकृष्णाच्या पदरी कोर्ट आणि पोलिस ठाणे

ब्लॉग, सामाजिक
August 13, 2020

स्वाध्याय परिवारातील वादामुळे श्रीकृष्णाच्या पदरी कोर्ट आणि पोलिस ठाणे

आज श्रीकृष्णाष्ठमी. यानिमीत्ताने एका दुर्देवी वादाची माहिती वाचकांना देत आहोत.
स्वाध्याय परिवार कोणाला माहीत नाही? स्वाध्यायचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामुळे हा पंथ देशभर पसरला. व्यसनमुक्तीचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. अनुयायी वाढले की मतेमतांतरे होतात.

अशाच एका वैचारिक आणि त्यातून उगम पावलेल्या कायदेशीर वादळाची ही हकीगत. लढा प्रदिर्घ काळ चालूच आहे. मात्र भरडले गेले, स्वाध्याय परिवाराचे परमदैवत श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची एक नयनमनोहर मुर्ती गेल्या कितीतरी वर्षापासून कुलूपबंद आहे.

कैलासवासी सु.का. जोशी. जळगाव शहरातले एक विद्यार्थीप्रीय विद्वान प्राध्यापक. स्वाध्यायच्या कार्यामुळे प्रभावीत झालेल्या जोशी सरांनी पुढे या कामात अक्षरशः झोकून दिले. पैसा, श्रम, लोकप्रियता सर्व काही त्यांनी स्वाध्याय परिवाराकरता वापरलं. पुढे त्यांच्यात आणि स्वाध्याय परिवारात मतभेद निर्माण झाले. अंतर वाढत गेलं.

त्यानंतर सु. का. जोशी सरांनी स्वतंत्र वाट धरली. त्यांनी संत ज्ञानेश्‍वर मंदिराची जळगावात उभारणी केली. जोशी सरांनी या ज्ञानेश्‍वर मंदिरात भगवान योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. कायदेशीर वादाची सुरुवात इथूनच झाली. स्वाध्याय परिवाराने याला हरकत घेतली. श्रीकृष्णाच्या या मुर्तीचा कॉपीराईट आमचाच असा दावा त्यांनी केला. हा विषय कोर्टात गेला. कोर्टाच्या आदेशानूसार पोलिसांनी ती वादग्रस्त मुर्ती पोलिस स्टेशनला आणून ठेवली. ही घटना 2003-2004 या वर्षातली. त्यानंतर सुमारे दिडदोन वर्षे ही मुर्ती पोलिस ठाण्यातल्या भाविकांना दर्शन देत होती. न्यायालयाच्या एका आदेशानंतर या मुर्तीची पोलिस ठाण्यातून सुटका झाली. आणि ती ज्ञानेश्‍वर मंदिरात विराजमान झाली.

मात्र ती कुलूपबंद अवस्थेत ठेवण्यात आली. आता या मुर्तीच्या गाभार्‍याला दोन कुलूप आहेत. एक स्वाध्याय परिवाराचे, दुसरे ज्ञानेश्‍वर मंदिराचे. पूजाअर्चा बंद.

कुलूपे कायम, न्यायालयात वाद नेणारे दोनही पक्षकार काळाच्या पडद्याआड आणि श्रीकृष्णाची मुर्ती दोन-दोन कुलूपांच्या बंद गजाआड. श्रीकृष्णाची सुटका आता कधी होणार? कोण पुुढाकार घेणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts