वाचनीय

स्टार्ट अप ३ : केटरींग रोजगाराचा सुवर्णपथ

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

हल्ली जो तो नोकरीसाठी शिकत असतो. उच्च पदवी घेणार्‍या प्रत्येकास चांगल्या पगाराची नोकरी मिळतेच असे नाही. त्यामुळे ज्यांना नोकरी मिळाले नाही त्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होतो. ज्याला नोकरी मिळाली तो आणि त्याच्या परिवारातील पाच दहा जण खुश होतात. मात्र एक असा व्यवसाय आहे की ज्यात तुम्ही नोकर न बनता मालक होतात आणि स्वत:बरोबर चार -पाच नव्हे तर कमीत कमी शंभर ते दोनशे जणांना रोजगार देऊ शकतात. तोही अल्प भांडवलात.

दुकान न घेता. नोकरीवाल्यापेक्षा तुम्हाला ओळखणारे जास्त असतील. जोपर्यंत तुमची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायासाठी खुपश जागा लागत नाही. लोक तुम्हाला शोधत घरी येवून बिदागी देवून तुमच्या व्यवसायाचा लाभ घेतील.


आता म्हणा सांगा आम्हाला असा कोणता व्यवसाय आहे तो…. वाचाच मग त्याबद्दल सोलापूरचे अरविंद जोशी सर काय सांगताहेत ते….

खरे तर मी या व्यवसायाचे शुद्ध मराठीतले नाव लिहायला हवे होते. ते नाव आहे स्वयंपाकी किंवा आचारी. मी तसे नाव न लिहिता केटरर किंवा केटरिंग असे इंग्रजी नाव लिहिले आहेत. दोघांचेाही नाव वेगळे पण काम तेच मात्र केटररला जी प्रतिष्ठा आहे ती आचार्‍याला नाही. कारण आचारी म्हटल्यावर कळकट पंचा नेसलेला, घामट चेहर्‍याचा आणि उघडा वागडा, तसेच एका खांद्यावर मळकट पंचा टाकलेला एक माणूस आपल्या नजरेसमोर येतो. केटरर तसा नसतो. म्हणून त्याला प्रतिष्ठा.

अर्थात असा फरक असला तरीही त्यांना काम मात्र एकच करायचे असते. तरीही कामाच्या स्टाईलमध्ये फरक असतो तो नाकारता येत नाही. आपण ज्यांना आचारी म्हणतो ते लोक अजून तरी मोठ्या समारंभात ठराविक मेनूचा स्वयंपाक करतात. साधारणत: जे लोक काही समारंभ आयोजित करून तिथल्या जेवणाचा मेनू स्वत: ठरवतात आणि त्यासाठी आवश्यक ते साहित्य आणून आचार्‍यांना देतात. सामान्यत: स्वयंपाक करण्याची मजुरी देऊन त्यांना गुंतवलेले असते.

केटरिंग व्यवसाय याबाबत वेगळा आहे. या व्यवसायातला केटरर मजुरीवर काम करीत नाही. तो पूर्ण जेवणाचे कंत्राट घेतो. त्यासाठी लागणारे सारे साहित्य तो दिलेल्या ऑर्डरनुसार स्वत:च खरेदी करतो. त्याचे पदार्थ तयार करण्याची जबाबदारी घेतो आणि त्यासाठी लागणारे आचारी आणतो. स्वयंपाक करणे, वाढणे, पाणी पुरवणे आणि शेवटी पानाचा विडा देणे अशी सारी कामे तो कंत्राटाने करतो. या साठीचे कंत्राट तसे फार महाग असते आणि त्यात बरीच कमाई होते.

आचारी हे नेहमीचेच पारंपरिक पदार्थ तयार करतात. केटरर हा मात्र अनेक प्रकारचे पदार्थ पुरवत असतो. त्याला निरनिराळ्या राज्यातल्या पदार्थांची माहिती असते. एखाद्या लग्न समारंभात सीमांत पूजनाचे जेवण, सकाळचा नाश्ता, मुख्य भोजन आणि व्याहीभोजन असे जेवणाचे प्रकार वेगळे असतात आणि त्या त्या जेवणाचा मेनू काही ठराविक प्रकारचाच असतो. तो तयार करण्याची त्याची तयारी असते आणि त्यातही काही वेगळेपणा दाखवायचा असेल तर तोही दाखवण्याची त्याची तयारी असते.

आजकाल अनेक सुशिक्षित मुले या व्यवसायात आली आहेत. मोठ्या शहरात काही तरुण मुले आणि मुली मिळून गटाने हा व्यवसाय करीत आहेत. समाजाचे राहणीमान वाढले आहे. अनेक प्रसंगात जेवण हा प्रकार आवश्यकच झाला आहे.

पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण, साखरपुडा, जावळ, बारसे असे कार्यक्रम थाटाने आणि भरपूर पैसे खर्चुन साजरे करण्याची अहमहमिका लागलेली आहे. लोकांकडे पैसा आहे. ही सारी आधुनिक पद्धतीने केटरिेंग करणारांसाठी पर्वणी आहे.

आजच्या मराठी तरुणांनी कसलीही लाज न बाळगता हा व्यवसाय करावा. वाटल्यास त्यासाठी लागणारी भांडी, टेबल, खुर्च्या, यांची स्वत:च जमवाजमवी करावी. छान धंदा आहे. या व्यवसायात जम बसला की (आणि बसतोच) आपल्या सोबत आणखी दहा पाच पुरुष आणि दहा वीस महिलांनाही आपण कायमचा रोजगार पुरवू शकतो. त्यांच्या संसाराला हातभार लागतो.

या व्यवसायात आपण काय पाहिजे ते तयार करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सगळेच प्रकार काही एकटा माणूस तयार करू शकत नाही. त्यामुळे त्या त्या प्रांतातले आचारी संपर्कात असले पाहिजेत. म्हणजे ग्राहकांनी मागणी केलेला पदार्थ आपण केलाच पाहिजे. आम्ही हा पदार्थ तयार करीत नसतो वगैरे भाषा चालत नाही.

मी महाराष्ट्रात काही ठिकाणी परराज्यातले कंत्राटदार बोलावलेले पाहिले आहेत. आपण कोठे तरी कमी पडतो म्हणून ही आयात केलेली असेल तर आपण ती कमतरता भरून काढू शकलो पाहिजे.

अरविंद जोशी

साोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts