वाचनीय

स्टार्ट अप २ : ताईचा डबा

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्ताने अनेकांना बाहेरगावी राहावे लागते. अशावेळी सर्वात मोठी चिंता असते ती चांगल्या जेवणाची. लहाण मोठ्या हॉटेल्स, खानावळीतील सततच्या खाण्यामुळे त्रास होत असतो. अशावेळी घरच्या जेवणाची आठवण हमखास येतेच. पण असे घरचे जेवण देणार कोण ? कोठे मिळेल याची चिंता या नोकरदार, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना असते. त्यांची गरज पुरविण्याचा एक नामी स्टार्टअप फंडा आहे.
अगदी उपलब्ध असलेल्या भांडवलावर आणि घरातूनच हा व्यवसाय करून स्वत:सह इतर चार जणांनाही रोजगार उपलब्ध करता येवू शकतो. ते कसे हे सांगताहेत सोलापुरचे अरविंद जोशी सर…. वाचाच त्यांचा ताईचा डबा कसा आहे ते…

खाण्याशी संबंधित धंदे अनेक आहेत. रेस्टॉरंट, बेकरी, आइस क्रीम पार्लर, किराणा दुकान, मेस, धाबा, कँटीन, मिठाईचे दुकान, खानावळ असे कितीतरी प्रकार आहेत. ते आपल्याला समोर दिसतात. त्यामुळे त्यातला कोणताही धंदा मी आता वर्णन करून सांगणार नाही. पण त्यातले काही धंदे आपल्याला समोर दिसतात मात्र त्यांचे प्रोफाईल आपल्याला दिसत नाही. असे धंदे म्हणजे भेळ, पाणीपुरी, चायनीज. आपण हे धंदे हलके समजतो आणि त्यांच्यावर फुली मारतो पण या धंद्यात धमाल कमाई आहे. माझ्यावर विश्‍वास बसत नसेल तर स्वत: चौकशी करा.

रस्त्यावर खारे दाणे. फुटाणे, वाटाणे विकणे हे तर आपण भिकार धंदे समजतो. तुम्हीही तसेच समजत असाल तर जरा या धंद्यातला कच्चा माल, त्यावर भाजण्याची प्रक्रिया करण्याचा खर्च यांचा अंदाज घ्या आणि एकदा प्रयोग म्हणून ते विकूनच बघा ना ! शपथ सांगतो. एकदा तुम्हाला या धंद्यातला नफा कळला तर जन्मात तुम्ही दुसरा धंदाच करणार नाही.

काही लोक केवळ इडल्या तयार करून हॉटेलांना पुरवतात. तर काही लोक नाना प्रकारच्या मिठाया तयार करून त्या मिठाईच्या दुकानांना पुरवत असतात. काही लोक केवळ खवा तयार करण्याच्या धंद्यात गर्क असतात तर काहींनी रस्त्यावर गाडा उभा करून फळांचे ज्यूस विकायचा धंदा पत्करलेला असतो. काही लोक अनेक प्रकारचे औषधी रस विकतात तर काही लोक सोडा विकतात. वडा पाव, पाव भाजी, भजे, असे पदार्थ विकणारे लोक हजारो रुपये कमवतात पण आपण त्यांचा तिरस्कार करतो.

गावागावातल्या महाविद्यालयात ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात आणि त्यांना चांगला जेवणाचा डबा त्यांच्या रुमपर्यंत पोच हवा असतो. काही लोक नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतात आणि त्यांना डब्याची गरज असते कारण त्यांची फॅमिली त्यांच्या मूळ गावात असते. माझ्या माहिती प्रमाणे अनेक शहरांत असे डबे पुरवणारे लोक आहेत आणि साधारणत: दहा बारा डबे पुरवण्याचे काम मिळाले तर त्यातून होणार्‍या नफ्यात घर चालते.

हा धंदा फार सोपा आहे. त्याला फार मोठे भांडवलही लागत नाही. मी अशा अनेक महिला पाहिल्या आहेत की त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. अनेक महिलांवर काही ना काही कारणाने घर चालवण्याची जबाबदारी येऊन पडते. कोणाचा नवरा मरण पावलेला असतो. कोणाचा नवरा व्यसनी असतो. कोणाच्या नवर्‍याची नोकरी अस्थिर असते तर कोणाला पगार अत्यल्प असतो.

अशा महिलांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ज्या क्षणाला आपल्यावर आता जबाबदारी आहे असे लक्षात आले त्या क्षणाला धक्का बसला पण हळुहळू कोणीतरी हे काम सुचवले. सुरूवात केवळ दोन डब्यांनी झाली पण डबा आवडलेल्या याच लोकांनी आणखी काही लोकांना रेफरन्स दिला. आपोआप काम वाढत गेले. आता संसारातल्या कमतरतेवर चांगली मात केली आहे.

या धंद्याचे एक वैशिष्टय असे की, त्याला कसला परवाना काढावा लागत नाही. कसलाही टॅक्स भरावा लागत नाही. जागा लागत नाही. शिक्षणाची अट नाही. कर्ज काढण्याची आवश्यकता नाही. कोणाकडून अडवणूक होण्याची भीती नाही. पण केवळ जेवणाचा दर्जा चांगला असला की आपोआप तो वाढत जातो. मोठ्या शहरात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येऊन राहिलेले असतात. तेव्हा डब्यांची गरज मोठी आहे.

पुण्यात तर अशा डब्यांना फार मागणी आहे. तेव्हा डबे तयार करणार्‍या ताई आणि डबा हवा असणारे भाऊ यांच्यात समन्वय साधण्याचे काम करणारा ‘ताईचा डबा’ या नावाचा नेटवर्कचा धंदा उभा राहिला आहे. तसाही प्रयत्न तरुण मुले करू शकतात. त्यातून अनेक गृहिणींना घराबाहेर न जाता काम मिळते आणि भाऊंना घरचा डबा मिळतो. समन्वय साधणारांना कमीशन मिळते.

अरविंद जोशी

साेलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts