वाचनीय

वैचारीक : मन तुझं शुध्द

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

सध्याची स्थिती पाहता सळसळणार्‍या तरूणाईवर आणि बालकांवर संस्कार होत असले तरी ते पुरेशे नसल्याचे दिसते. रावणाच्या ताब्यात असलेली सीता, भरसभेत वस्त्रहरण होत असलेली द्रौपदी आजही पदोपदी दिसत आहे. आजचा समाज शिक्षणाने प्रगत होत असतांना आजच्या महिलांच्या नशिबी सीता आणि द्रौपदीचे जीने का यावे? बाल्यावस्था ते किशोरावस्थेपर्यंत शुध्द असलेले मन असे कलुषीत का व्हावे? सर्व संमतीने विवाह होत असतांना काही दिवसात लक्ष्मीनारायणाचा जोडा असा विभक्त का व्हावा ?

दोन पैश्यात मौजमजा म्हणून तीचाच बळी का जावा ? यासारख्या अनेक प्रश्नांची मालिका उभी राहते. समाजातील अनिष्ठ प्रथा, रूढींना तिलांजली देण्यासाठी आयुष्य वेचलेल्या त्या समाजसुधारकांचे संस्कार, त्यांचा त्याग आपण विसरत जात आहोत का ? याचे उत्तर काही अंशी होकारार्थी तसे नकारार्थीही येईल. या नकारार्थी उत्तराचे होकारात रूपांतर करण्याची ताकद केवळ संस्कारातच आहे. कुंभार मडके घडवितांना त्यावर कितीतरी वेळा हाताने थोपडत असतो. त्यातून त्याला चांगले वळण देतो.

कोळश्याच्या भट्टीत चांगले भाजून ते मडके तयार करतो. असे मडके घरी आणल्यावर कितीतरी जणांची तृष्णा भागवत असते. अगदी याचप्रमाणे बालवयातच संस्काराची विण घट्ट व्हायला हवी. कारण तेव्हाच मन शुध्द आणि सुंदर असते. अशाच शुध्द मनाबद्दल सांगताहेत मुंबईच्या ॲक्टर, रेडीओ जॉकी आणि व्हाईस आर्टिस्ट हेमा निकम… वाचू या मन शुध्द तुझं…

महाभारतातला द्रौपदीचा अपमान आणि रामायणातला सीतेचा अपमान यात जमीन अस्मानचा फरक आहे. एकीकडे द्रौपदीने हसून थट्टेच्या सूरात दुर्योधनाचा पाणउतारा केला होता तर दुसरीकडे सीतेने पदोपदी रामाची सावली होऊन, प्रत्येक सुख-दु:खात साथ देत चौदा वर्षांचा वनवास भोगला होेता. दोन्ही ठिकाणी स्त्री ’बळी पडली. एक दुर्योधनामुळे आणि दुसरी रावणामुळे. पण तटस्थ भूमिकेतून पाहिलं तर दोन्ही वेळेस त्यांचे आपले पुरूष ‘पतिदेव’ या समयास कारणीभूत ठरले.

एकाने द्युतास पत्नीस ‘पणा’ला लावले आणि दूसर्‍याने परीट म्हणतो म्हणजे म्हणून. समाज म्हणतो म्हणून पत्नीला राज्यातून आणि आयुष्मातून निष्कासित (दूर) केले. जे घडणार होत ने घडले. असे म्हणून गोष्ट संपवणं यापेक्षा हे घडण्याआधी क्षणभर मनाला विचारा, की हे बोलू का ? किंवा हा निर्णय घेवू का ? विचारायला नको?


आमच्या पीढीला या दोन्ही Epic Drama बद्दल कितपत आणि काय माहीत आहे. ठाऊक नाही. पण काय घ्यावं आणि कश्यापासून दूर रहावं हे प्रत्येकाला कळावं म्हणूनच महाभारत आणि रामायण याचं बीज लहानपणीच रूजावं आणि मनावर सयंम यावा असं पालकांनीच पाऊल उचलायला हवं.


लग्नसंस्था आज टिकण्यासाठी किंवा कुमार्गापासून स्त्री-पुरुब दोघांनी दूर राहण्यासाठी मनावर नियंत्रण येणं अत्यंत जरूरीचं आहे. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर’, ‘किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर’ हे जाणून घेणं आणि त्या मनाला ताब्यात ठेवणं आज निकडीच आहे. कित्येक संसार माझं पटलं नाही म्हणूनही उद्धवस्त झालेले दिसतात.

त्यावर नंतर कधीतरी बोलू. मुळात मनावर संस्कार करणं अत्यंत सोप नसलं तरी अवघड देखील नाही. जेवढं गरजेचं आहे ते मिळाल्यास ते संतुष्ट झालेच पाहिजे आणि हे पदोपदी त्यावर गिरवण हेच प्रत्येकाचं आजच्या युगात प्रथम ‘कर्म’ असावे.

हे ‘कर्म’ सक्षमपणे केल्यास पुढील वाटचाल सुकरच होईल, यात काही शंका नाही. ‘मना सजना’ चे श्लोक घरोघरी कमीत कमी काय करावे काय करू नये यासाठी तरी ऐकले जायला हवेत. श्रीहरी मिळेल का, याची अपेक्षा न ठेवता शालेय शिक्षण, तारुण्य जीवन आज बदललंय आणि ते काळानुरूप बदलत राहणार. बदल हा मानवी जीवनात आवश्यक आहे, पण साधं-सरळ आणि सोप्पं जीवन जगयाच हा एकच नियम किंवा मार्ग म्हणजे पाया भक्कम हवा.


मी सामान्य जीवनास महत्व देते किंवा देतो. कितीही पैसा आला तरी माझ्या गरजा आणि खर्च मोजकाच असणार . माझ्या नातेसंबंधाना मी जपणार. आणि माझे मन फक्त जे योग्य, चांगले आहे त्यालाच आकर्षित करणार. ही भावना सतत मनात रूजवायला हवी. मनपटलावर कोरत राहिली पाहिजे.

आयुष्याच्या चार भागात बाल्य, तारूण्य, गृहस्थाश्रम आणि वार्धक्य या प्रत्येकाचे नियम पाळले आणि त्या पद्धतीने आयुष्यात पाऊल उचलले तर कुठलीच गोष्ट बाधा बनून अडचण निर्माण होणार नाही.
यावर एकच उपाय बाल्य आणि तारूण्यावर संस्कार म्हणजे त्यांच्या त्या वयाच्या मनावर संस्कार करणे होय.

हेमा निकम

ॲक्टर, रेडीओ जॉकी आणि व्हाईस आर्टिस्ट,

मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts