वाचनीय

वैचारीक : भारतीय समाजक्रांतीचे अग्रणी : महात्मा जोतीराव फुले

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

भारतातील थोर समाजसुधारकांत महात्मा ज्योतीबा आणि सावित्री बाई यांचे कार्य न भूतो न भविष्यती असेच आहे. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा खरा पाया या दांम्पत्याने रचला. तत्कालीन समाजाने त्यांच्यावर खुप आरोप केले. त्यांच्यावर थुंकले, शेण फेकले. पण त्यांनी घेतला वसा टाकला नाही. आणि म्हणूनच आजच्या स्त्रीयांचे ते खरे दैवतच म्हटले पाहीजे. अशा या थोर समाजसुधारकाच्या विविधांगी पैलूंवर प्रकाश टाकणारा हा जळगावचे प्रसिध्द साहित्यीक जयसिंगराव वाघ यांचा हा लेख वाचलाच पाहीजे….

भारतातील बहुतांश समाज हजारो वर्षे तरी बंदिवासातच होता. बुध्द काळात त्याला मानसन्मान मिळाला नाही असे नाही. मात्र त्या नंतर तो पुन्हा हा समाज बंदिस्त झाला व त्या नंतर त्यास मानसन्मान मिळावा. या करीता सर्वप्रथम कोणी प्रयत्न केले असतील तर ते महात्मा ज्योतीराव फुले यांनीच.


भारतामध्ये इंग्रजांनी सन 1813 मध्ये सर्वांसाठी शिक्षण असा कायदा केल्याने भारतातील सर्वच जातीधर्मांची मुलं शिक्षण घेवू शकणार होती मात्र कायदा तसा कागदावरच राहिला. काही विशिष्ट समाजाची मुलं सुध्दा गुरुजींच्या घरीच शिक्षण घेवू लागले. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार प्रसार होत नव्हता. मात्र 1824 मध्ये एका ख्रिस्तिधर्मोपदेशकाने पुण्यात खाजगी शाळा सुरु केल्या. त्या मुळे या खाजगी शाळां मध्ये जावून इतर समाजाची मुलं शिक्षण घेवू लागली. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार, प्रसार काही प्रमाणात सुरु झाला व विशिष्ट समाजाच्या व्यतिरीक्त मुलांनाही शिक्षण मिळू लागले. याचा परिणाम म्हणून जोतिबांच्या वडिलांनी आपल्या मुलाला म्हणजे जोतीबाला 1833 मध्ये ‘‘चर्च ऑफ स्कॉटलॅण्ड मिशन’ च्या शाळेत शिकण्यासाठी पाठविले.

जोतीबा शाळेत जावू लागले मात्र कृष्णाजी देव नामक एका ग्रहस्थाने जोतीबाला शिकविणे किती वाईट आहे असे जोतिबांच्या वडिलांना पटवून दिले. या कृष्णाजी देवच्या सांगण्याला गोविंदराव बळी पडले व त्यांनी जोतीबाला 1836 मध्येच शाळेतुन काढून टाकले. जोतीबा शिक्षणास मुकले. मात्र त्यांच्या शेजारी रहात असलेले गफ्फार बेग यांनी तसेच एक ख्रिस्तिमधर्मोपदेशक लिजीट यांनी गोविंदरावांची वारंवार भेट घेवून जोतिबाला शिक्षण देणे किती चांगले काम आहे, शिक्षणाने जोतीबाचा, तुमच्या कुटूंबाचा कसा उध्दार होईल हे पटवून दिले.

यामुळे गोविंदरायांचे मन बदलले व त्यांनी पुन्हा म्हणजे सन 1841 मध्ये (तब्बल 5 वर्षा नंतर) जोतीबांना इंग्रजी शाळेत दाखल केले. सन 1841 ते सन 1847 पर्यंत त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. तसे पाहिले तर जोतीबांनी 10 वर्षे शिक्षण घेतले. त्या काळात एवढी वर्षे शिक्षण घेणे हि फार मोठी गोष्ट होती. एवढे वर्षे शिक्षण घेणार्‍यास त्या काळी फार मोठ्या हुद्याची अगदी सहज नौकरी मिळत असे.

जोतीबांना सुध्दा मोठ्या मोठ्या हुद्दयाच्या नौकरीची संधी चालून आली होती. पण त्यांना त्यात रुची नव्हती. एवढे शिक्षण घेवूनही त्यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले व ते वडिलांना मदत करु लागले.


शिक्षण घेत असतांना त्यांच्या वाचनात थॉमस पेन यांचे ‘राईटस् ऑफ मॅन’ हे पुस्तक वाचण्यात आले. हे पुस्तक त्यांना एवढे भावले की, ते वारंवार हेच पुस्तक वाचू लागले. याच पुस्तकाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला आणि ते नौकरीच्या मागं न लागता सार्वजनिक कार्यात सहभाग घेवू लागले. जनतेची सेवा हेच माझे ध्येय असे त्यांनी जणू जाहिर करुन टाकले होते. वडिलांना व्यावसाईक मदत करीत करीत ते गरीबांनाही मदत करु लागले होते. जोतीबांची जनसेवा वडिल गोविंदरावांनाही आवडू लागली होती. त्यांचे ते सार्वजनिक कार्य पाहून गोविंदराव आनंदी होत असत.


इंग्रजांनी भारतात इंग्रजी शाळा सुरु केल्या नंतर इंग्रजीचे शिक्षण घेणारे जे कोणी नावारुपास आले त्यात प्रामुख्याने राजाराम मोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, कृष्णशास्त्री चिपळूणकर, केशव लक्ष्मण म्हात्रे, सदाशिवराव गोवंडे वगैरे मंडळी सुध्दा होती नाही असे नाही, महात्मा फुले हे त्याच काळातील एक व्यक्तीमत्व कि ज्यांनी इंग्रजीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र फुलेशिवाय अन्य मंडळी इंग्रज दरबारी नौकरीस लागले. मोठ मोठ्या हुद्यावर त्यांना नेमण्यात आले. त्या मुळे कोणाला रावसाहेब तर कोणाला रावबहाद्दूर अशा पदव्याही मिळाल्या, मोठ मोठ्या हुद्यांवर असल्याने या मंडळींना प्रचंड मान-सन्मान-प्रसिध्दी-पैसा मिळाला पण फुले यांना जो मानसन्मान मिळाला तो त्यांच्या स्वत:च्या सामर्थ्याने व सामाजिक सेवेतून मिळाला.

असे आपणास दिसून येते. महात्मा फुले यांना केवळ मराठी-इंग्रजी या दोनच भाषा अवगत नव्हत्या तर या दोन भाषांबरोबरच उर्दू, कानडी, मद्रासी, गुजराथी अशा एकुण 6 भाषा येत होत्या. इंग्रजीच्या शेवटच्या परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधुन ते पहिल्या क्रमांकाने पास झालेले आहेत. वरिल सर्व मान्यवर मंडळिंना इंग्रजीच्या शेवटच्या परिक्षेत म.फुले यांच्या पेक्षा कमी गुण मिळालेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शिक्षणात फुले खूपच पुढे होते. त्यांनी शालेय शिक्षणा बरोबरच शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस पेन यांचे विषयक बरिच पुस्तके वाचून काढली व त्याच मुळे ते सरकारी हुद्याच्या मोहपाशात अडकु शकले नाही. सामाजीक कार्य, जनतेची सेवा, जनतेचे कल्याण या बाबीं करिता त्यांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग करण्याचा संकल्प केला.


आपल्या सार्वजनिक कार्याचा शुभारंभ त्यांनी मुलींच्या शिक्षणापासून सुरु केला. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये मुलींना मग ती कोणत्याही जातीची असो तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्रजांमुळे विशिष्ट समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील किमान मुलांना तरी शिक्षण मिळण्यास सुरवात झाली होती. त्यास हि प्रचंड विरोध होत होता. अशा प्रसंगी मुलींच्या शिक्षणाचे कार्य हाती घेणे, मुलींकरिता स्वतंत्र शाळा काढणे तर अगदिच क्रांतिकारी घटना होती.

आपले शिर आपल्याच तळहातावर घेवून काम करण्याचा तो प्रकार होता पण, हि जोखीम फुलेंनी घेतली. त्यांनी दिनांक 14 जानेवारी 1848 रोजी पुणे शहरातील तात्यासाहेब भीडे यांच्या वाड्यात मुलींसाठीची स्वतंत्र पहिली शाळा सुरु केली. भारतातील ती मुंलींची पहिली शाळा ठरली. या शाळेत 4 ब्राह्मण व 2 बहुजन समाजातील मुलीना त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेण्यास पाठविले. ‘मुलगी शाळेत शिकू लागली’ असे भारतात प्रथमच म्हणता येवू लागले. महात्मा फुलेंच्या कार्याला सदाशिवराव गोवंडे, सदाशिव हाटे, आदि. लोकांचे (कि ज्यांनी म. फुलेंप्रमाणेच इंग्रजीचे शिक्षण घेतले होते) खूप सहकार्य लाभले. फुलेंच्या शाळेत शिक्षण घेणार्‍यांमध्ये उच्च समाजातील मुलींचे प्रमाण अधिक असतांना, या शाळेत मुलीना शिकविणारे शिक्षक त्याच उच्च सामजातील असतांना, फुलेंच्या या कार्याला सहकार्य करणारे वकिल दोन व्यक्ती सुध्दा त्याच उच्च समाजातील असतांना सुध्दा मुलीच्या शिक्षणाला याच उच्च समाजातून कडाडून विरोध होवू लागला. हा विरोध छूप्या पध्दतिने तर कधी उघड होवू लागला.

मात्र फुलेंनी या सर्व विरोधांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी आधिच करुन ठेवली होती. आपल्या विरोधास जोतीबा जुमानत नाही हे कळून चूकल्या नंतर या मंडळींनी आपला मोर्चा त्यांचे वडिल गोविंदराव यांच्याकडं वळविला व जोतीबाला या कार्यापासून रोखण्यात यावे अशी त्यांना गळ घातली. गोविंदराव पार घाबरुन गेले. त्यांनी जोतीबांना सदरचे कार्य बंद करण्याविषयी खूप खूप विनवणी केली, तुझ्या या कार्यामुळे समाजात काय विपरीत परिणाम होतील हे ही सविस्तर पणे बोलून दाखविले.

पण जोतीबा काही एक ऐकुन घेण्यास तयार नव्हते. जोतीबा आपले म्हणणे ऐकत नाही विरोधक त्यांचा दबाव काही कमी करित नाहीत अशा भयंकर परिस्थितीत गोविंदराव अडकले तेव्हा त्यांनी जोतीबाला एकतर मुलींना शिकविण्याचे काम बंद कर नाही तर घरातून निघता हो असा निर्वाणीचा सल्ला दिला. जोतीबांनी घरातून बाहेर निघणे पसंत केले. पण मुलीच्या शिक्षणाचे काम सोडले नाही. आपल्या कामाकरिता म्हणजेच मुलीच्या शिक्षणाकरिता महात्मा फुले आपल्या पत्नीस घेऊन रस्त्यावर राहू लागले. त्या वेळेस त्यांचे वय 21 वर्षाचे तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई केवळ 17 वर्षांच्या होत्या आणि या दोघांच्या लग्नाला अवघे 8 वर्षे झालेले होते.

1848 मध्ये त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली आणि लागलीच 11 महिन्यांनी म्हणजे डिसेंबर 1848 मध्ये महार-मांगांच्या मुलांसाठी पुण्यातील मराठवाड्यात एक स्वतंत्र शाळा काढली. भारतातील पहिली मुलींची शाळा काढण्याचा बहुमान जसा महात्मा फुले यांना आहे तसाच महार-मांगांच्या मुलांकरीता भारतातील पहिली शाळा काढण्याचा बहुमान सुध्दा त्यांचाच आहे. 1948 या वर्षातच त्यांनी मुढवे येथील महारवाड्यात मुला-मलीं करीता स्वतंत्र शाळा काढली. या नंतर 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलीची शाळा काढली अशा प्रकारे 1848 ते 1851 या कालावधीत त्यांनी एकुण 10 शाळा काढल्या. भारतामध्ये 18 व्या शतकात एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा काढणारा भारतातील एकमेव महापुरुष म्हणून हि जोतीरावांना गौरविले जावू शकते.

भारतात इंग्रजांनी शिक्षणाची सुरवात केली खरी पण या शिक्षणाच्या गंगोत्रीचं पाणी काही विशिष्ट लोकांच्याच दारा पर्यंत जावू लागले होते. हे पाणी इतरांपर्यंत जावूच नये म्हणून जागोजागी बंधारे-धरणे बांधू व त्यास अडविण्याचा प्रयत्न केला जावू लागला होता व खूद्द इंग्रज सरकारही या घटनांची मुक साक्षीदार होवून पाहू लागली होती. आमच्या धर्मानुसार मुलीनी-विशिष्ट समाजा व्यतिरिक्त इतर सर्वच समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे नसते, त्यांनी शिक्षण घेतले तर धर्मावर मोठे अरिष्ठ येते व आमच्या धर्मात लुडबुड करण्याचा कुणालाही अधिकार नाही.

अशी बतावणी हि मंडळी करत असे. त्यामुळे इंग्रजांचा सुध्दा नाईलाज होत असे. पण महात्मा फुलेंनी या सर्व गोष्टींना धूडकावून लावत सर्वांसाठी सारखेच शिक्षण हे ब्रिद अंगीकारुन शिक्षणाच्या गंगोत्रीचं पाणी इतरांच्याही दारापर्यंत नेले. हे त्यांचे आगळे वेगळेपण सर्वांना मान्य करावे लागले.
शाळा काढून फुल्यांनी एका नव्या भारताच्या पाया भरणीची सुरुवात केली होती. कारण शिक्षण हे सर्वच समस्यांवरचं जालीम उपाय आहे. तेव्हा अधिकाधिक लोक शिक्षीत व्हावे. याकरिता फुलेंचा खटाटोप होता.

त्यांच्या या कार्याने पुणे शहरात त्यांचा मोठा लौकीक वाढला होता. शिक्षणाच्या क्षेत्रात तर त्यांच्या इतका सन्मान अन्य शैक्षणिक कार्यकरणार्‍या अन्य कोणत्याच व्यक्तीस मिळाला नाही. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दिनांक 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबागेत मोठ्या जनसमुदायासमोर इंग्रज सरकारने त्यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला. इंग्रज सरकारच्या वतिने पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांनी त्या वेळच्या 193/- रुपये किंमतीच्या 2 शाली (1 जोतीबा फुलेंना व 1 सावित्रीबाई फुलेंना) प्रदान केल्या. या वेळेस बापूराव मांडे व प्रा.मोरेश्‍वर शास्त्री यांची भाषणे झालीत या भाषणांमध्ये या दोघं मान्यवरांनी म. फुले यांच्या कार्याची भरभरुन प्रशंसा केली.

या कार्यक्रमात म. फुले यांनी मी माझे हे कार्य केवळ माझ्या सदसदविवेक बुध्दिला पटले म्हणून केलेले आहे. असे आपल्या सत्कारास उत्तर देतांना सांगीतले. या कार्यक्रमास पुणेकरांबरोबरच युरोपीयन स्त्री-पुरुष तसेच इंग्रज अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. या समारंभाचा मोठ-मोठ्या बातम्या त्या वेळेच्या पुण्यातील वृत्तपत्रांनी छापलेल्या आहेत असे धनंजय कीर यांनी नमूद केले आहे. महावस्त्राने एखाद्याचा सत्कार करणे हि त्या काळी फार मोठी सन्माननीय बाब मानली जात असे. तो सन्मान जेव्हा म. फुलेंना मिळाला तेव्हा त्यांचे वय अवघे 25 वर्षांचे होते. या कार्यक्रमास जोतीबांचे वडिल गोविंदराव सुध्दा हजर होते.

आपल्या पोराच्या कार्याचा एवढा मोठा सन्मान केला जातो आणि मी मात्र माझ्या पोराला ते काम करु नको म्हणून सांगत होतो, एवढच नाही तर त्याला घराबाहेर काढून दिले याची मला आज लाज वाटत आहे. असे बोलून ते ढसाढसा रडले आणि आपल्या चुकीची त्यांनी माफीही मागीतली. अशा थोर पुरूषास अभिवादन.

जयसिंग वाघ
16, अजिंठा हौसिंग सोसायटी,
अजिंठा चौक, जळगांव
(मो. 98819 28881)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts