जळगावच्या रंगभूमीने अनेक कलावंत घडविले आहेत. विविध कारणांमुळे त्यातील अनेकजणांनी करीअरसाठी मुंबई पुण्याची वाट धरली तर काही जण संधी नसल्याने रोजीरोटी सांभाळून रंगभूमीची सेवा करत आहेत.
वर्ष १९९२ – १९९३ जळगाव जिल्हा आणि राज्यभरात झालेल्या महाविद्यालयीन वादविवाद, वकृत्व स्पर्धा असो वा रंगभूमी. यावर आर. आर. विद्यालय आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या संघाच नाव कोरल जायचं. जळगाव जिल्ह्यात विविध महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी घेतलेल्या या स्पर्धात मुंबई, पुणे, रत्नागिरी, औरगाबाद, येथील विद्यार्थ्यांचा दबदबा होता. या स्पर्धेत अमुक अमुक कॉलेजने भाग घेतला ना मग ट्राफी गेलजीच समजा असे सूर उमटत असत. पण या सर्वांना छेद दिला अनुमपा ताकमोगे हीने.
नूतन मराठा महाविद्यालयात तत्कालीन प्राचार्य डॉ. के, आर. सोनवणे, मराठी विभागाच्या प्रा. डॉ. सुलोचना साळुखे मॅडम, प्रा. मधुकर साळुंखे, नाट्यकर्मी आणि प्रा, राजेंद्र देशमुख, नाट्यकर्मी चिंतामण पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या तालमीत अनुपमा घडत गेली. वादविवादापासून सुरूवात करून अनुपमाने आता मुंबईत रंगभूमी, चित्रपट आणि हिेंदी मराठी मालिकातून आपल्या कसदार अभिनयाने अभिनय सृष्टीत एक स्व:तच स्थान निर्माण केले आहे.
नावात काय असते असे शेक्सपिअर म्हणत असला तरी त्याची दुसरी बाजू ही अनुपमाने मात्र सार्थ ठरवली आहे. वाचू या या ‘अनुपम’ प्रवासाविषयी….. तिच्याच शब्दात… अवर लोकल मार्केटच्या वाचकांसाठी…..
मी साधारण पहिलीत असताना माझा रंगमंचावरचा पहिला प्रवेश झाला. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये मी झाशीची राणी लक्ष्मीबाई झाले आणि मेरी झांसी नही दुंगी, नही दुंगी नही दुंगी असं म्हणत माझा अभिनय प्रवास सुरू झाला.माझ्या त्या वेळेच्या बाईंनी माझ्या बाबांना सांगितलं की ही मुलगी चुणचुणीत आहे आणि तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या
लहानपणी शाळेत असताना माझे बाबा माझी वक्तृत्व वादविवाद, कथाकथन, एकपात्री अभिनय, नाट्यछटा अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयारी करून घ्यायचे.
जळगावात गिरवले धडे
मी धुळ्यात आणि जळगावात होते. माझं बारावीपर्यंतचे शिक्षण जळगावात झालं जळगावात मी शाळा-कॉलेजात (आर. आर. विद्यालय/ नूतन मराठा कॉलेज ) असतांना मी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बक्षिसं मिळवली. त्यावेळी जळगावातील सांस्कृतिक वातावरण अतिशय उत्तम होते. खान्देश नाट्य प्रतिष्ठान, रंग सेवक, पंचम, व. वा .वाचनालय यासारख्या विविध संस्था त्यावेळी हिरीरीने नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होत असत.त्यामुळे माझ्यातील कलागुणांना जळगावात भरपूर संधी मिळाली. नाट्यकर्मी चिंतामण पाटील आणि ज्ञानेश्वर गायकवाड या दोन्ही दिग्दर्शकांचे मला संस्कारक्षम वयात मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी माझे बाबा मला स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जळगाव हुन मुंबईला घेऊन जात असत. शाळा अटेंड करून मग रात्री मी आणि बाबा दुसऱ्या दिवशीच्या मुंबईच्या स्पर्धेसाठी एस. टी. ने मुंबईला जायला निघत असू. दुसऱ्या दिवशी मुंबईत स्पर्धेत भाग घेऊन लगेच त्याच दिवशी रात्री पुन्हा मुंबईहून निघून, रात्रभर एस. टी. ने प्रवास करून येत असू आणि लगेच पुन्हा दुसऱ्या दिवशी मी शाळेत आणि बाबा ऑफिसमध्ये जात असत.
बाबांच्या त्या वाक्याने मला कलावंत केलं
माझ्या ज्या भाषणासाठी एकपात्री अभिनयासाठी मला जळगावात पहिला नंबर मिळत असे त्याच भाषणासाठी मला मुंबईला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळत असे. असे करता करता मी मुंबईच्या स्पर्धांमध्ये सुद्धा भरपूर भाग घेऊ लागले . माझा मुंबईच्या स्पर्धांमध्ये किंवा जळगावच्या स्पर्धांमध्ये देखील पहिला नंबर जरी आला तरी बाबा मला परीक्षकांना माझं काय चुकलं ? अजून मी काय सुधारणा करायला हवी ? असे विचारायला सांगत असत. तुझा जो पहिला नंबर आला आहे तो फक्त या वीस-पंचवीस किंवा पन्नास जणांमध्ये आला आहे, याचा अर्थ तुला सगळेच यायला लागले असे नाही. हे माझ्या बाबांनी कायमच माझ्या मनावर ठसवले म्हणूनच मी कायम प्रगती करत राहिले.
करीअरसाठी मुंबईला प्रयाण
बारावीपर्यंत माझे ठरले होते की मी अभिनय क्षेत्रात करिअर करणार .पण या करिअर साठी मुंबई ला शिफ्ट खूप गरजेचं होतं म्हणून मग फक्त माझ्या करिअर साठी म्हणून माझ्या वडिलांनी त्यांच्या साहेबांना सांगून त्यांची बदली मुंबईला करवून घेतली आणि 1993 पासून मी मुंबईला राहायला गेले.
मुंबईमध्ये माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रगतीसाठी आणि साहित्याच्या अभ्यासासाठी सुद्धा रुईया हे कॉलेज योग्य असेल हे माझ्या वडिलांनी जाणले होते. मला बारावीला 67 टक्के गुण मिळाले होते ते मला रुईया कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश मिळवून द्यायला पुरेसे होते.
रुईया कॉलेजमध्ये प्राध्यापिका पुष्पा भावे आणि प्राध्यापिका मीना गोखले यांच्यासारख्या समर्थ प्राध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली साहित्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. ज्याचा मला माझ्या करिअरमध्ये आणि आयुष्य जगत असतानाही पुढे खूप उपयोग झाला.
एक तपाचा अनुभव
सलग 12 वर्ष राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, एसटी नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, कथाकथन स्पर्धा या सगळ्या स्पर्धांमधून अनुपमातील ही ‘अभिनेत्री’ घडत गेली. यावेळी दिग्दर्शक विजय निकम यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आमच्यावेळी आजच्यासारखे विविध चॅनल नसल्याकारणाने हौशी रंगभूमी वर भरपूर काम करून अनुभव मिळवणे, शिकत राहणे हाच आमच्यासाठी एक पर्याय होता. ज्यामुळे आमचा पाया मजबूत झाला.
पदवीच्या अंतिंम वर्षापासून व्यावसायीक रंगभूमीवर प्रवेश
पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी “अलगुज” या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित मालिकेत प्रथमतः काम केले. त्यानंतर एम. ए. च्या पहिल्या वर्षाला असताना अशोक पाटोळे लिखित माऊली प्रोडक्शन निर्मित “दांडेकरांचा सल्ला” हे माझे पहिले व्यावसायिक नाटक. ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत निर्मिती सावंत विजय चव्हाण आणि प्रदीप कबरे होते. त्यानंतर एवढंच ना ! घोडं बघून बसा, रघुपती राघव राजाराम, केव्हा तरी पहाटे, टाइम प्लीज यासारख्या व्यावसायिक नाटकातून डॉक्टर गिरीश ओक ,रमेश भाटकर , अरुण नलावडे यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर कामे केली.
शेजारी शेजारी पक्के शेजारी, कळत नकळत, सांजसावल्या, रेशिम गाठी, तू माझा सांगाती, कॉमेडीची बुलेट ट्रेन, कॉमेडीची जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा या मराठी आणि कगार,सावधान इंडिया, क्राइम पेट्रोल कोर्टरूम, महाबली हनुमान या आणि इतर अनेक हिंदी सिरियल्स मधून भूमिका केल्या.
मेरी आवाज सुनो
हे सगळं करत असताना Dubbing आणि Voicing क्षेत्रात सुद्धा माझा उत्तम जम बसला अनेक जाहिराती, डॉक्युमेंटरीज, मराठी/हिंदी चित्रपट, कार्टून फिल्म आकाशवाणीवर चे विविध कार्यक्रम आकाशवाणी वरची नाटके. यासाठी आवाज दिला . जॉयस मायर हिचा स्पिरिचुअल प्रोग्रॅम मी इंग्रजी तून मराठीत डब केला. जो गेली वीस वर्षे सुरू आहे.त्याशिवाय स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲप’वर आता मी प्रथितयश लेखकांनी लिहिलेली दर्जेदार पुस्तके वाचत आहे.
माझा अभिनय प्रवास डबिंग आणि Voicing क्षेत्रातील प्रवास आई-वडिलांच्या आशीर्वादाने, नटराजाच्या,सरस्वतीच्या कृपेने, हितचिंतकांच्या सदिच्छेने, अनेक मान्यवर दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाने आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने सुरू आहे आणि सुरू राहील.
अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे पण मागे वळून पाहताना आपल्या प्रवासाविषयी समाधान वाटते हेही नसे थोडके……
अनुपमा ताकमोगे
नाट्यकलावंत व
अभिनेत्री, मुंबई