दिवाळी आली ज्येष्ठांना त्यांच्या बालपणाच्या दिवाळीची आठवण हमखास येतेच. दुपारी नातवंडांना अंगाखांद्यावर मांडीवर खेळवत त्यांना त्यांच्या बालपणातील दिवाळीची गोष्ट सांगीतली जात असे. तर नातवंडही त्यांनी केलेल्या दिवाळीच्या नियोजनावर गप्पा होत.
आता तो काळ गेला. गावाकडची ती घरेही गेलीत आणि अनेक बाबीही काळासोबत लुप्त झाल्यात. मात्र या दिवाळीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनाच्या एका कोपर्यात ताज्या आहेत. अशाच काहीच्या मनाच्या कोपर्यातील दिवाळीची आठवण सांगताहेत जळगावच्या वैशाली पाटील……
दिवाळी हा सण आनंदाचा,उत्साहाचा,पावित्र्याचा अन लख्खप्रकाशाचा .अशी हि शुभ दिवाळी अर्थात दिपोत्सवास सुरुवात लवकरच होणार आहे.कोरोना चे सावट असले तरी प्रत्येक घरात ती चैतन्य, आनंद आणणार आहे.सारे शहर विद्युत रोषणाई ने चमचम करायला लागणार आहे. हे सगळं हवं हवं स असलं तरी का कुणास ठाऊक पण मन भूतकाळात डोकावत आहे.
बालपणीची दिवाळी आठवत आहे.आता असते इतकी चैनी ची दिवाळी तेव्हा नक्की च नव्हती.आम्ही मुळात सामान्य कुटुंबातील.वडील शिक्षक.आम्ही पाच बहिणी आणि चुलत 4 भावंडे. त्यामुळे आमची दिवाळी टिपिकल घरगुती पद्धती ची असायची.पण त्यात हि विलक्षण आनंद,मौज असायची.सण तोच,मुहूर्त तोच,पूजा तीच आणि फराळ हि तोच पण आनन्द मात्र अस्सल… आणि कमालीचा वेगळा.
आमच्या वेळी दिवाळीत सकाळीच रेडिओ वर लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया किंवा दिपावली मानायिये सुहानी, अशा गाण्यांनी दिवाळी ची जोरदार सुरुवात व्हायची. वर्षोनु वर्षे दिवाळी हिवाळ्यात च येते पण तेव्हा च्या थंडीत आणि आता च्या थंडीत हि खूप फरक झालेला दिसतो.दिवाळी च्या आधी पासून आमचे हातपाय फुटलेले असायचे.यावर आई खोबरेल तेल दयायची, ते अंगाला लावून घरीच बनवलेल्या उटण्याने ,कनिकेच्या दिव्यांच्या प्रकाशात मोरीत पाच चक्क दिवस शाही स्नान आमचे व्हायचे.
त्यावेळी मोती साबण सोन्या सारखा महाग वाटे मग दिवाळीतील 1 दिवस आजोबा माशाचा आकाराचा साबण आणत असे त्याने आम्ही स्नान करीत असू.आता तो माशा चा आकाराचा साबण आपण वॉश बेसिन्ग ला हँड वॉशर म्हणून वापरतो!
पण त्यावेळी तो साबण हि आम्हाला खूप निराळा वाटत असे.अंघोळीच्या गंगाळ मध्ये अत्तरा चे 2 थेंब आमच्या साठी विलक्षण भारी असायचे.संध्याकाळी अंगणात शेणाचा सडा घालण्यास आमची भांडणे व्हायची.मग आजोबा भल्या मोठ्या अंगणाचे 4,5 भाग करून द्यायचे.
प्रत्येकी आपला सडा आणि रांगोळी करीत असू. रांगोळी पण कशी तर, नदी पात्रातून शिरगोळे आणून खलबत्त्यात कुटून त्यात कुंकू,हळद,गुलाल,बुक्का असे पदार्थ कालवून रंगीत रांगोळी तयार करीत असू.फराळ बनवतांना हि आमची लुडबुड असायचीच.
प्रसंगी मार, ओरडा हि मिळायचा.कधी तो पदार्थ देवापुढे जातो आणि कधी तो पोटात पडतो याकडे लहानगण्यांचे च नाही तर मोठ्यांचे हि लक्ष असायचे.कारण लक्षमीपूजना पर्यंत कोणालाच धीर नसे आणि तसे हि आमच्या कडे खाण्यासाठी कसलेच कडक नियम नसत.केले कि खा एवढेच .संध्याकाळी पणत्या लावताना पुन्हा सर्वाना धाब्याची विभागणी करून दिली जायची.
पन्नास साठ पणत्या लावल्या जायच्या. मागचे दार,पुढचे दार, धाबे,साने,खळे,गोठे,पायऱ्या, खेडे गावातील उकिरडे, मंदिरे अस कुठं कुठं पणत्या लावायला जात असू आम्ही. रात्री पुन्हा फटाक्यांची पुन्हा नऊ हिस्से व्हायचे .त्यात आम्हा मुलींच्या वाटेला फुलबाज्या,नाग गोळी,टिकल्या,लहान लवंगी फटाके च यायची.
त्यात हि कोणाचे किती फुसके निघाले यात चढाओढ असे. लक्ष्मी बॉम्ब,सुतळी बॉम्ब भुई चक्कर चुलत भावांना मिळायचे. त्यात हि घरातून कापसा कडे लक्ष द्या रे अस हजारदा आदेश यायचे. भाऊ बीजेला भावांना आणि वडील आजोबा यांना ओवळताना ताटात पडलेले 20,20 रु उचलताना भारी कौतुक वाटायचे.
पाडव्याला आई वडिलांसोबत आमची सुद्धा तेलाने मालिश करून न्हाऊ घालायची, औक्षण करायची.हे सर्व क्षण टिपण्यास तेव्हा कॅमेरा किंवा मोबाइल नव्हता पण मनाच्या कॅमेऱ्यात कायम कोरून ठेवले त्यामुळे आज हि हवी हवीशी वाटते.खूप साधी आणि अशी दिवाळी होती.
आज ची आपली दिवाळी सुगंधी उटणे आणि मोती साबणाच्या शाही स्नाना ची, चमचम रोषणाई ची,लख्ख प्रकाशणाऱ्या आकाशकंदील,रेखीव रंगीत स्टिकर रांगोळीची ,मेणबत्या च्या आणि रंगवलेल्या पणत्यांची आणि विकतच्या क्लास वन फराळाची असलेली दिवाळी किती हि सुंदर असली तरी माझ्या मनाला न भावणारी अशी च आहे.
हा बदल मी ही स्वीकारला, खरेदी ,आधुनिक पद्धत मी ही स्वीकारली पण तरी हि तो लहानपणी चा आनंद, उत्साह आता च्या दिवाळीत मला सापडत नाहीय..तो कुठे तरी हरवलाय हे मात्र नक्की.
वैशाली पाटील
जळगाव