वाचनीय

प्रात: समयी : दीपावली पाडवा

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

दिवाळी पाडवा म्हटला की शास्त्रीय संगिताची व त्यातील सदाबहार गीतांची मैफील तर व्हायलाच हवी. दिवाळी पाडव्याच्या पहाटेच्या त्या रूणूझूणूत्या गुलाबी थंडीत सर्व वाद्ये आणि गायक किंवा गायीकेचा समुधर आवाजातील गाणे ऐकणे म्हणजे एक अर्वणीय संधीच होय.

तबल्याचा नाद, गीताची लकेर आणि सनईचे सुर, उगवत्या दिनकराची अंगावर पडलेले पिवळेधम्मक किरणे….. व्वा..व्वा….. तर चला वाचू या अशाच एका दिवाळी पाडव्याबाबत. लेखक आहेत भुसावळचे प्रसिध्द तबला वादक व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगित विभागाचे प्रा. तेजस मराठे..

पहाटेचा सुखद गारवा, स्वच्छ निळे आकाश असा सगळा माहोल कार्तिक महिन्याची चाहुल देत असतो. आपल्या देशात दक्षिणेपासून उत्तरे पर्यंत तसेच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वर्षातला हा ‘सगळ्यात सुंदर मोसम कार्तिक महिन्यापासून सुरू होतो. म्हणूनच आपण सर्व या तीन (कार्तिक, मार्गशिर्ष पौष) महिन्यांची वाट पाहत असतो.

आपल्याकडे कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सणवार यातील ठळक मोसमांवरच प्रामुख्याने आधारलेले आहे. अंधकाराचा नाश करुन दिव्यांचा प्रकाश उजळवणारा सण म्हणजे दिवाळी.

हा दीपावलीचा सण याच थंडीच्या मोसमात सुरूवातीला येतो. दिवाळीत नरक चतूर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर येणारा कार्तिक शुध्द प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त म्हणून हा दिवस साजरा करतात.
देवालयीन संगीत काळात सर्व मंदीरातून “षोडपचार पूजा ही साग्रसंगीत केली जात असे. संगीताशिवाय कोणतीही पूजा पुर्ण होत नाही. आता त्यामधील फक्त टाळ, घंटी, हस्तवादन (टाळ्या) हे वाद्य आणि आरती हे उरलेले आहे. याशिवाय संगीताचे वैशिष्ठे म्हणजे संगीतात जाती असतात पण त्याचा सामाजिक जाती जमातीशी काही संबंध नसतो.

स्वरांच्या , तालाच्या जाती वेगळ्या आणि समाजातील वेगळ्या असतात. धर्मच म्हणायचा तर संगीताला फक्त सौंदर्याचाच धर्म असतो. संगीताव्दारे मनोरंजनाचं कार्य हे समाज कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण असते. संगीत हे आपल्या समाजासाठी नवीन कल्पना, नवीन उमेद नवीन सौंदर्य हे सगळं प्रदान करते. सध्याच्या काळात पुर्ण विश्वात प्रत्येक देशात काही न काही प्रकारे आपसात वैमनस्य वाढत आहे. परंतु त्या प्रत्येक देशातील संगीतज्ञ कलाकार एकत्र आहेत. आणि त्यांच गायन, वादन, नृत्य हे दुस-या देशात मोठ्या आदराने प्रेमपूर्वक बघितले जाते. तसेच ऐकले जाते.


‘पाडवा ‘पहाट हे संस्कृतीच द्योतक आहे. दिवाळी हा आनंद उत्सव आहे. दूष्ट अर्धमींचा नाश केल्यानंतरची आनंदी पहाट असे असे देखील म्हटले जाते आणी संगीत हे आनंद व्दिगुणीत करते म्हणून ही आनंदी पहाट अधिक आनंदमय करण्यासाठी विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट अशा संगीत सभांचे आयोजन केले जाते. संगीताच्या माध्यमातून विधात्याचे आभार मानले जातात. अभ्यंगस्नान केल्यानंतर नवीन कपडे घालून स्वर तानाची मैफील अनुभवणे हा सांस्कृतिक दृष्टया समृध्द करणारा अनुभव असतो.

या सांस्कृतीक वातावरणात भर टाकाणार्‍या मैफलित महत्वाचा वाटा हा पाडवा पहाट चा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात कराणारा उत्सवच. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये मैदान, बागा नाट्य मंदीरे अशा ठिकाणी संगीत, नृत्य, वादन या विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी दिपावली पहाट, पाडवा पहाट या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पाडवा पहाटच्या अनेक मैफिली असल्यामुळे आणि त्यात रसिक श्रोता हा महत्वाचा भाग असल्याने काही ठिकाणी सायंकाळी हा कार्यक्रम ठेवला जातो. त्याचे ‘सांजपाडवा’ अस नामकरण देखील झाले आहे.


दिवाळीच्या निमिताने सांस्कृतीक पर्वणी अनुभवण्याची संधी असते. परंतु यावर्षी संपुर्ण देशावर कोरोना या महाभयंकर आजाराचे संकट आलेले आहे. या कोरोना सारख्या महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध आलेले आहेत. हे निर्बध लक्ष्यात घेवून यावर्षी दिवाळी पाडवा पहाट हे कार्यक्रम बरेच ठिकाणी ऑनलाईन् आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनंद आभासी कार्यक्रमात मिळत नसल्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाबदल कलाकार आणि आयोजक साशंक आहेत. तसेच या कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीचा “फटकाही या सांस्कृतिक क्षेत्रालाही बसला आहे. यामूळे यावर्षी सास्कृतीक कार्यक्रमांची संख्या घटली आहे.

यावर्षी आलेले हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर नष्ट होवून दिवाळीच्या निमित्ताने होणार्‍या पाडवा पहाट या सांस्कृतीक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवायची संधी रसिकांना, कलाकारांना, आयोजकांना पुन्हा एकदा मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

प्रा. सतीश मराठे
भुसावळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts