जळगाव : आजपासून महाराष्ट्रासह गुजरातमध्ये शारदीय नवरात्रोवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. कोरोनाचे संकट असल्याने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सार्वजनिक मंडळात आणि घरगुती मंडळात देवीच्या प्राणप्रतिष्ठेसह घटांची स्थापना करण्यात आली आहे.
भारतातील विविध राज्यात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. अनेक भाविक देवींच्या शक्तीपीठांना भेटी देवून दर्शन घेत असतात. अशीच शक्तीपीठे परदेशातही आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल ९ शक्तीपीठे परदेशात आहेत.
अशी झाली शक्तीपीठांची निर्मिर्ती
दुर्गा सप्तशती या पौराणिक ग्रंथात देशभरातील ५१ शक्तीपीठांच्या निमिर्तीमागील रहस्य नमुद केलेले आहे. त्यानुसार दुर्गा म्हणजेच सती हिने पती शंकराचा अपमान सहन न झाल्याने यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूने सैरभैर झालेले महादेव तिचे शरीर घेऊन वणवण फिरत होते तेव्हा विष्णुने सुदर्शन चक्राने तिच्या शरीराचे तुकडे केले. ते ५१ विविध ठिकाणी पडले व ही स्थळे म्हणजे माता सतीची शक्तीपीठे म्हणून प्रसिद्धीस आली.
या सर्व ठिकाणी माता सतीची व शंकराची पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. नेपाळ मध्ये २, पाकिस्थानात एक, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक आणि बाग्लादेशात चार अशी एकूण ९ शक्तीपीठे आहेत.
१) गंडकी : नेपाळच्या गंडकी नदीच्या उगमावर हे शक्तीपीठ आहे. माता सतीचा उजवा गाल या ठिकाणी पडला असा समज आहे. येथे देवीला गंडकी नावाने तर महादेवांना चक्रपाणी या नावाने ओळखतात.
२) गुहेश्वरी : नेपाळमधील पशुपती मंदिराजवळच गुहेश्वरी मंदिर आहे. येथे देवी सतीचे दोन्ही गुडघे पडले असा समज आहे. येथे सतीला महामाया व शिवाला कपाल नावाने पूजले जाते.
३) हिंगलाज : पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तानात हिंगोल नदीच्या काठी हे स्थान आहे. हिंगलाज माता मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. येथे सतीचे मस्तक पडले असा समज असून देवी सतीला भैरवी तर शिवाला भीमलोचन या नावाने पुजले जाते.
४) श्रीलंका : येथे सतीचे पैंजण पडले असा समज आहे. येथे सतीला इंद्राणी व शिवाला राक्षसेश्वर या नावांनी पुजले जाते.
५) मानसरोवर : तिबेटमधील मानसरोवर येथे माता सतीचा उजवा हात पडला असा समज आहे. येथे सतीची दाक्षायणी तर शिवाची भैरव म्हणून पूजा होते.
६) सुगंध : बांग्लादेशातील हे स्थान सुंगध नदीच्या काठी आहे. येथे माता सतीने नाक पडले असा समज आहे. येथे सतीला उग्रतारादेवी या नावाने तर शिवाला यम्बक या नावाने ओळखले जाते.
७) करतोया तट : हे ठिकाणही बांग्लादेशातच आहे. भवानीपूर येथे माता सतीच्या डाव्या पायातील पैंजण पडला असा समज आहे. येथे सतीला अपर्णा नावाने तर शिवाला वामन नावाने पूजा केली जाते.
८) भवानी मंदिर : बांग्लादेशातील चितगांव पासून ३८ किमीवर असलेल्या सीताकुंड स्टेशनपासून जवळ हे ठिकाण आहे. चंद्रशेखर पर्वतावर असलेल्या या भवानी मंदिराच्या ठिकाणी माता सतीचा उजवा बाहू पडला असा समज आहे. येथे सतीची पूजा भवानी रूपात तर शिवाची पूजा चंद्रशेखर म्हणून केली जाते.
९) यशोर : हे स्थानही बांग्लादेशातच असून जसौर शहरात आहे. येथे माता सतीचा डावा हात पडल्याचा समज आहे. येथे सती यशोरेश्वरी नावाने तर शिव चंद्र नावाने पूजले जाते.