आज घटस्थापना… नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ दिवस… विविध मनांच्या अंतरंगाचे नऊरंग….
घटस्थापना म्हणजे नवनिर्मितीची पूजा… भू-मातेची पूजा… या दिवशी भू मातेची पूजा केली जाते पत्रावळीवर ओलसर माती घेऊन त्या मातीत पाच प्रकारची धान्ये पेरली जातात. या मातीवर पाण्याने भरलेला मातीचा घट त्यामध्ये पाच विड्याची पाने आणि नारळ ठेवून फुलांची माळ घातली जाते. बाजूला नऊ दिवस रात्रंदिवस अखंड प्रज्वलित नंदादिप असतो. घटातून पाझरणा-या पाण्याचा ओलावा, नंदादीपाच्या ज्योतीचा प्रकाश आणि तिच्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या उबदार वातावरणात या नऊ दिवसांत त्या पेरलेल्या धान्याला अंकूर फुटून सुंदर कोवळे हिरवे-पोपटी पानांचे तुरे येतात. हिरवा रंग म्हणजे समृध्दीचे प्रतीक हीच नवनिर्मितीची पूजा…
नवरात्री या शब्दातील ‘नव’ या शब्दाचे ‘नव म्हणजे नवीन’ आणि ‘नव म्हणजे नऊ’ असे दोन अर्थ होतात. घटस्थापनेला आपण नवनिर्मितीची नऊ दिवस आणि नऊ रात्री पूजा करतो, दहाव्या दिवशी त्याचे उद्यापन करतो तो दिवस दस-याचा. पण या नवरात्र उत्सवात जे त्या घटाच्या मातीतून अंकुरलेले धान्य आहे त्याचीच पूजा म्हणजे सृजनीची पूजा आणि त्याचाच हा उत्सव.
आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवनी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठांचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात. नवव्या दिवशी म्हणजे दसञयाच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.
ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.
ही शक्ती देवता देशभरांत अन् वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते.
देवी कां प्रकट झाली? कशासाठी अन् कशी प्रकट झाली? ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.
तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.
त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.
देवीची नऊ रूपे
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
नवरात्रातील नऊ माळा
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
पहिली माळ- शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ- अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्याआ फुलांची माळ.
तिसरी माळ- निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
चौथी माळ- केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ- बेल किंवा कुंकवाची वाहतात.
सहावी माळ- कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ- झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ- तांबडी फुले. कमळ,
जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ- कुंकुमार्चनाची वाहतात.
अखंड दीपप्रज्वलन करणे
दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.
नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :
नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश असताे.
आरती राजेश धर्माधिकारी
नवी मुंबई