वाचनीय

नवरात्री विशेष : दुर्गा आणि स्त्री

ब्लॉग, सामाजिक
October 18, 2020

नवरात्रोत्सवातील आज दुसरी माळ ….नऊ दिवस देवीच्या उपासनेचे .. अर्थात स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे.. उत्सव असतो नऊ दिवसांचा… आम्ही मात्र तो वर्षानूवर्षे साजरा करत असतो.. विविध निमित्ताने… त्याचाच एक छोटासा प्रयत्न… विविध महिलांतील लेखन क्षमतेला जागृत करत त्यांच्या अर्तमनाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांना, भाव-भावनांना मुक्तपणे शब्दरुपातून मांडण्याचा हा प्रयत्न.. स्त्रीशक्तीच्या सहकार्याने त्यांच्याच सहभागाने… वाचू या आजपासून नऊ दिवस… विविध मनांच्या अंतरंगाचे नऊरंग…. अवर लोकल मार्केट च्या माध्यमातून.
आजच्या दुसर्‍या माळेच्या मानकरी आहेत यावल येथील शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या निरभ्र निर्भय या संस्थेच्या संस्थापीका डॉ. मनिषा महाजन… वाचू या त्या काय म्हणतात…….

‘दुर्गा’ या नावाची ताकद सांगते, शक्तिशाली पराभव करणे, ताकतवान, अजिंक्य, अपराजेय आणि खूप सारे काही…
याचे महत्व पूरातनकाळापासून आहे. दूर्गेसोबत त्या येतात नवदुर्गा, दूर्गेच्या नऊ रूपांची पूजा या नवरात्रीत मोठ्या उत्साहाने केली जाते. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पध्दतीने देवीची पूजा केली जाते. इतिहासात डोकावून पाहीले तर हडप्पा संस्कृतीच्या काळापासून या दूर्गांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असो की बौंध्द धर्म, जैन, शिख या सर्व धर्मांमध्येच नव्हे तर इंडोनेशिया, कंबोडीया व्हिएतनाम येथे केलेल्या उत्खनात दूर्गा देवीचे अवशेष आढळले आहेत.

खर सांगायचं झाले तर दुर्गा ही स्त्री आहे आणि तिचे समकालीन इतिहास आणि बरचं काही बोलण्यासाखे आहे. अगदी आपण असे म्हणू या की दूर्गा ही एक स्त्री आहे. पण आजच्या दूर्गेची व्यथा काय आहे ? स्त्री चळवळ आणि दुर्गा पूजा दोन्ही पण बदलत्या काळानुसार बदलत गेल्या. दूर्गापुजेचे वैभव वाढले, मंडळ स्थापन झालीत. दांडीया, गरबा आणि इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होवू लागले. त्यानिमित्ताने का होईना स्त्रीया घराबाहेर पडल्यात. त्यावर आजकाल दांडीया स्पर्धा आणि बरच काही चांगले होवू लागले. याच अभिनंदन करावसं वाटते. चार भिंतीच्या बाहेरही जग आहे हे स्त्रियांना बाहरेच्या जगात एकरूप व्हायला लागल्या. स्त्रीया आधुनिक व्हायला लागल्या.


पण बदलत्या काळानुसार आजची स्त्री चळवळी किती आणि कश्या आहेत ? आज स्त्रीया समाजात वावरतांना त्यांचे प्रश्न कसे आहेत, त्यांचे सामाजिक, आर्थिक, भौगोलिक विविध पैलूवर काही बदल झाला का ? यांचाही विचार करणे गरजेचे आहे.


आपण आज कोणत्याही मंदिरात गेलो की तिथे पुजारी पाहतो. आता आपण म्हणालं यात नवलं काय ? असा प्रश्न नाही पडत नाही का, की स्त्रीया या पुजारी का नाही होऊ शकत. अगदी कालपरवा तुळजा भवानी मातेच्या झोपेचा कालखंड सुरू झाला, तेव्हा मुर्ती सर्व पुरूषांनी उचलली होती. माझा प्रश्न इथे सुरू होतो की स्त्रीयांना आज सुध्दा आपण तेथे स्थान देतो का ? स्त्रीयां पुजारी का नाही होऊ शकत?. कारण आपली मानसिकता अजुन पुरूष सत्तेच्या गुलामीच्या बेड्यात अडकली आहे. आणि असं माननारा वर्ग हा स्त्रीयांचा आहे याचा खेद वाटतो.


काही वर्षापासून एक नवीन ट्रेंड आलाय दुर्गापुजेला सर्वजण एकत्र मिळून पार्टी करतात. सर्व सुहासीनी बायका त्यात हजेरी लावतात. उच्चभ्रू पासून तर मध्यमवर्गीयांपर्यंत. सर्व एकत्र येवून सौभाग्याची वस्तू एकमेकांना देतात, हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. आपल्या आजुबाजूला असलेल्या घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या स्त्रीयांना मात्र त्या विसरतात. त्यांना यासाठी बोलावत नाही. कारण काय तर त्या अपशकुनी असतात. अशा कार्यक्रमांना या स्त्रीयांना बोलावले तर सर्व अघटीत घडते. या स्त्रीयांना अशा कार्यक्रमात अगदी लग्न समारंभात ते दुर्गा पूजा पर्यंत सर्व कार्यक्रमात त्यांना टाळले जाते.

अशा सर्व दुर्गाचा विचार कधी होवू नये इतका आजचा समाज बुध्दीने अपंग झालाय का ?. आपण आजवर पाहत आलो की, दुर्गा पुजा ही सौभाग्यवती स्त्री किंवा पुरूष करतात. किंवा परवाच उदाहरण घ्या, येरमाळा आणि आई तुळजा भवानी येथून ज्योत आणुन आपल्या मंडळातील देवीची ज्योत प्रज्वलीत केली जाते. प्रश्न असा पडतो की ही ज्योत स्त्री आणू शकत नाही का ? का तिला अधिकार नाही. स्त्री आजपण गुलाम आहे. याचे उदाहरण द्याचे झालेच तर नवरात्रीमध्ये महिलांना ‘त्या’ चार दिवसांचा त्रास होऊ नये म्हणून गोळ्यांचे सेवन केले जाते. एक डॉक्टर म्हणून बघतांना या महिलांना मानसिक आधार द्यावासा वाटतो.

या सर्व स्त्रीया गुलामीत पिढ्यानपिढ्या अडकल्या आहेत. गरज आहे स्त्रीयांनी स्वत:ची मानसिकता बदलण्याची. आणि पुरोगामी विचारकांनी या बदलासाठी प्रेरीत करण्याची. आता काही मंदिरांमध्ये स्त्रीयांना प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. नाही तर स्त्रीया एवढ्या अघटित आणि अपशकुनी की अजुनही स्वत:ला स्वतंत्र करू शकल्या नाही.

अनेक गोष्टी दिसतात. पण बोलणार कोण ? देवीला स्नान घालणे, साडी नेसवणे, पूजा करणे हे काम पुरूष पुजारी कसे काय करू शकतात. हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.


आज सुध्दा मुलगी जन्माचे स्वागत करण्यासाठी सरकारला ‘बेटी बचावो’ सारखा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर करावा लागतो. आजसुध्दा स्त्रीयांचे जटील प्रश्न, मानसीक आरोग्य, शिक्षण, हिंसा, दारिद्र, बलात्कार, विनयभंग, कुटुंब नियोजन, तसेच स्त्री विषयक कायदे अजुन बरचं काही वरवर सोडविले जातात. त्यात थोडी ललकारी फोडायची झाली तर लिंग बदलुन झालेली स्त्री म्हणजे तृतीयपंथीं. यांनी शस्त्रक्रिया केली आणि पुरूषाचे रूपांतर स्त्रीमध्ये झाले तर अशा स्त्रीया फक्त व्याभिचारी धंदे करणार्‍या , पैसे उकळण्यासाठी स्वत : ला बदलवलेल्या म्हणणार्‍या लोकांची संख्या काही कमी नाही.

उलटपक्षी सुप्रीम कोर्टाने तसा कायदा पारित करून आज ७ वर्ष झाली तरी सुध्दा अश्या तृतीयपंथी स्त्रीयांचे स्वागत आणि त्यांना कायद्याने मनुष्य म्हणून जगण्याचे संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होतांना दिसतेय आणि भारत आतून कसा पोखरला जातोय याचे चित्र उभं राहते.


खरं तर आज भारतीय समाजातील मानसिकता बदलण्याची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. येणार्‍या पिढ्यांनी सुध्दा दुर्गा पुजा करतांना काही दुर्गांवर अन्याय होवू नये अशी प्रवृत्ती विकसीत करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण शालेय शिक्षणापासून तर समाजात, घरात, सार्वजनिक ठिकाणी चर्चा करून विषयाची गंभीरता पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे. ‘स्त्री जन्माची कहाणी’ बदलवू शकतो ही यशोगाथा रूजवण्यासाठी गरज आहे. त्यासाठी स्त्री मुक्तीसाठी लढणार्‍या संघटना, स्त्री चळवळी व्यापक होण्यासाठी व त्यात जटील मुद्द्यांना हात घालून समानतेच्या , समतेच्या आणि सन्मानाच्या वाटेवर जायची गरज आहे आहे.


त्यासाठी सर्व वंचित स्त्रीयांच्या खर तर प्रत्येक स्त्री ही तिच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी स्वत:ला वंचित समजते किंवा पिढ्यानपिढ्या चालु असलेल्या गोष्टींना प्रश्न न विचारता, बुध्दी कौशल्याचा वापर न करता तसेव पुढच्या पिढीला आदान प्रदान करते. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची.

त्यासाठी स्त्रीयांच्या जीवनात सकरारत्मकता आणणे, स्त्रीयांची एकजुट करणे, विविध प्रांतातील स्त्रीयांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, त्यातून जातीभेद नष्ट करणे, मनोरंजनाच्या माध्यमातून स्त्रीयांवरील समस्या समोर आणणे, महिलांच्या शक्तीचा पारंपारिक स्त्रोतावर लक्ष केंद्रीत करून दुर्गा,चंडी, काली या देवतांच्या प्रतिमांचे आणि कर्तृत्वाचे पुनरूज्जीवन करून आधुनिक स्त्रीला तिच्या अंगातील शक्तीची जाणीव करून देणे महत्वाचे आहे.

स्त्री पुरूष समानता, विवाह संस्था, लैगिक शिक्षण, कुमारवयीन मुलामुलींच्या समस्यांचे निवारण, मुलींच्या शिक्षणात येणार्‍या अडचणी , गैरसोयी, आर्थिक व मानसिक गरीबी, अंधश्रध्दा, धार्मिक कट्टरता, असंघटीत क्षेत्रातील महिलांच्या समस्या, बाळांतपणाची रजा यासारख्या विविध प्रश्नांवर विचार करून त्या सोडविल्या जाव्यात. तर दुर्गा पूजनाला अर्थ येईल.

डॉ. मनिषा महाजन.
शासकीय वैद्यकिय अधिकारी, यावल
तथा निरभ्र निर्भय या तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी काम करणार्‍या संस्थेच्या संस्थापक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts