दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिवाळी म्हणजे कौटूंबिक मिलनाचा सण, दिवाळी म्हटली की बालगोपाळांच्या मस्तीच्या उधानाचा सण, दिवाळी म्हटले की नववस्त्रे परिधान करण्याचा सण, दिवाळी म्हटली की मातीच्या शिकोर्यांचा प्रकाश, दिवाळी म्हटली की रंगेबिरंगी आकाशकंदीलाचा सण, दिवाळी म्हटली की घरांच्या भिंतीवर मनमोहक रंगीत विद्यूत रोषणाई लावण्याचा सण, दिवाळी म्हटती की घराच्या दारात आणि देवघरात सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्याचा सण आणि दिवाळी म्हटली की सकाळच्या चमचमीत, नमकिन फराळ हादडायचा सण….. आणि हो चार दिवस गोडधोड खाण्याचे सुध्दा…
अरे हो विसरलोच बालगोपालांसोबत किल्ले बनविण्याचाही सण… आणि….. आणि…. आणि….. चार दिसानंतर आपापल्या सासरी, नोकरीच्या ठिकाणी, कर्तव्याच्या ठिकाणी परतण्याचाही….या चार दिसांच्या आठवणींची शिदोरी मनात, डोळ्यात, मोबाईलच्या मेमरीत, व्हिडीओच्या चलचित्रात साठवलेले असतं….
फराळाविना दिवाळी दिवाळी वाटत नाही… चल तर मग फराळ कसा तयार करावा याची माहिती देताय मुंबईच्या आरती धर्माधिकारी…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. येथील प्रत्येकजण प्रकाश आहे. हा सण सर्व भारत, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरीशस, सुरीनाम, त्रिनिदाद आणि दक्षिण आफ्रिका मध्ये साजरा केला जातो. लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फराळ, मिठाई वाटतात. दिवाळीच्या दरम्यान आपण आपली गत काळातील दुःखे विसरून जातो. ते फटाके वाजवतो आणि सारे काही विसरून जातो.
फटाक्यांप्रमाणे गत काळ देखील जळून जातो, नष्ट होतो आणि आपले मन नवीन नूतन बनते. हि दिवाळी होय. फक्त दिवे लाऊन काही होणार नाही तर आपणा प्रत्येकाला आनंदी आणि प्रज्वलित व्हावे लागेल. प्रत्येकाला आनंदी आणि बुध्दीवान बनावे लागेल. बुद्धीमत्तेचा प्रकाश प्रज्वलित झाला आहे. प्रकाशाला ज्ञान रुपी प्रकाश ब नऊन त्याचा प्रसार करूया आणि आज उत्सव साजरा करूया.
दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात दिवाळी हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख सुखरात्री असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते.
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात.पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.
या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
सर्वांसाठी दिवाळीच्या आनंदाची व्याख्या ज्या बाबतीत समान होते ती गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो.प्रांतागणिक त्यातले पदार्थ बदलत जातात पण फराळाशिवाय दिवाळी नाही. महाराष्ट्रीय फराळाचा विचार करता लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खर्या अर्थाने द्विगुणित होते.
फराळाच प्रयोेजन काय ?
दिवाळी फराळ ही एक परंपरा मानली तर साहजिकच मनात या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेला जोडलेले आहेत. शेतीच्या दिवसात कष्ट करून थकलेल्या शेतक-याचा निवांत होण्याचा हा काळ. या काळात गोडधोड खाऊन तो स्वतःच्या शरीराचं कोडकौतुक पुरवू शकतो. या तेलकट तुपकट पदार्थांच्या माध्यमातून येणार्या थंडीसाठी तो शरीरात स्निग्धता साठवून घेत असतो. या प्रयोजनाने दिवाळीचं निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली.अशा या दीर्घ परंपरेतून मराठी घराघरात सिद्ध होणार्या फराळाकडे पाहतो, तेव्हा मराठी मुलखात हे पदार्थ नेमके कधीपासून बनवले जाऊ लागले याची उत्सुकता वाढते.
याच उत्सुकतेने या पदार्थांचं मूळ शोधायला गेल्यावर हाती येणारी माहिती मात्र प्रत्येक प्रांत आपल्या खाद्यपरंपरेचा समृद्ध वारसा जपत असतो. काही पदार्थांची नावं उच्चारल्यावर त्या प्रांताचे शिक्कामोर्तब होते. खाकारा म्हटल्यावर गुजरात आठवतो. रसगुल्ल्याचं बंगालशी नातं
मोदक किंवा पुरणपोळी मराठी मातीशी नाळ सांगतात. मात्र मराठी फराळातील पदार्थांचं मूळ शोधताना जाणवतं की आपल्या फराळाच्या थाळीतले अनेक पदार्थ इथले नाहीच .ते अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत. असे मूळचे परप्रांतीय पण आता आपलेच होऊन राहिलेले पदार्थ कोणते हे जाणून घेणं मजेशीर आहे.
लाडू
लाडूंचा प्रवास : सुश्रुतापासून इराणपर्यंत प्राचीन काळी चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध व गूळ यांच्यासह तीळ खाण्यास देत.
या मिश्रणाचे प्रमाण निश्चित व्हावे याकरता ते विशिष्ट मात्रेत गोलाकारात वळलेले असत.
त्यामुळे ज्याला आपण लाडू म्हणतो तो आकार पदार्थ म्हणून निश्चित होण्यापूर्वी औषधास सोयीस्कर म्हणून वळला त्यानंतर मग या आकारात अन्य घटक जसे की बेसन, रवा यांचे लाडू वळले जाऊ लागले. पर्शियन आक्रमणानंतर लाडू शाही झाला. त्यात सुकामेवा वाढला. बुंदी ही तर मूळ राजस्थानची त्यामुळे बुंदीचे लाडू देखील तिथून आपल्याकडे आले.
चकली
मुरुक्कू, चक्रिका, चकुलीते चकली लाडवाप्रमाणे अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेला आणि आपलाच वाटावा इतका परिचित झालेला अन्य पदार्थ म्हणजे चकली. चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने ओळखली जाणारी ही चकली दक्षिण भारतातून आपल्याकडे आली.
उपनिषद काळात चक्रिका अशा पदार्थाचा उल्लेख झालेला दिसतो. तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. जगभरात जिथे जिथे तामिळ मंडळी पसरली तिथे तिथे चकली
श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशातही तिचं आढळणं तिचं तामिळ कनेक्शन दाखवतं चकलीच्या गोलाकाराने या तामिळ मुरुक्कुचं रूपांतर चकरीत झालं आणि त्याचा मराठी अपभ्रंश चकली असा झाला.
करंजी होताना…
फराळात मानाचं स्थान जिला प्राप्त झालेलं दिसतं ती करंजी. शुभशकुनाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. ही करंजी प्राचीन काळापासून शष्कुली या नावाने परिचित होती.
या करंजीचं मूळ उत्तरप्रदेशात दिसून येतं. उत्तरप्रदेश- राजस्थान – गुजरात – महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठी घरात आली असावी. प्रत्येक प्रांतात तिचं नाव बदललेलं दिसतं हे आणखी एक विशेष.
अनारसा
मराठी फराळाच्या थाळीत सध्या अपवादाने आढळणारा पण सुगरणीच्या पाककौशल्याची परीक्षा पाहणारा पदार्थ म्हणजे अनारसा. या पदार्थाच्या मराठीपणाबद्दलदेखील शंका घ्यायला पुरेसा वाव आहे. याचं कारण म्हणजे अनारसे दोनच राज्यात विशेषत्वाने खाल्ले जातात एक महाराष्ट्र आणि दुसरं बिहार. या दोन्ही राज्यांमधलं भौगोलिक अंतर या पदार्थाच्या संदर्भात बुचकळ्यात टाकणारं आहे.
महाराष्ट्रात अनारसे हे केवळ दिवाळीच्या दिवसात फराळाच्या ताटापुरतं अस्तित्व दाखवत असले तरी बिहारमध्ये तिथल्या अस्सल बिहारी पदार्थात अनारशांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे अनारशांचे कुळ शोधताना ते बिहारकडे अधिक झुकलेलं दिसतं.
फराळी कडबोळं
कडबोळे हा पदार्थ अलिकडे फारसा फराळाच्या थाळीत आढळत नसला तरी त्याचं नाव आपल्याला एक विशेषण म्हणून पुरतं. या पदार्थाची माहिती शोधताना तो मराठी पदार्थ आहे असं सांगितलं जातं. मात्र कडबोळे हे नाव कन्नड कडबूच्या खूप जवळ जाणारे आहे. कडबू या कनार्टकी पदार्थाची पाककृती पूर्णत भिन्न दिसत असली तरीही कडबूचा डिक्शनरी अर्थ होतो गोंधळ, अडचणीची स्थिती आणि मराठीत आपण हे काय कडबोळं करून ठेवलंय? असा वाक्यप्रयोग त्याच अर्थाने करतो. त्यामुळे कडबोळ्यांचं दायित्व महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकाकडे अधिक असावं. या सगळ्या पदार्थांच्या अस्सल मराठीपणाची खात्री नसली तरी वर्षानुवर्षे ते आपल्या फराळाच्या ताटाची शोभा वाढवत आहेत.
परकीय आक्रमणाने यातल्या काही पदार्थांचा आपल्या संस्कृतीत समावेश झालेला दिसतो तर काही वेळा इथले राज्यकर्ते स्वारीच्या निमित्ताने परराज्यात गेल्यावर तिथून येताना आवडलेल्या पदार्थाना आपल्या सोबत घेऊन आलेले दिसतात.
आज या पदार्थाना मराठीच मानावं इतके ते आपल्या फराळाच्या डब्यात आणि आपल्या मनातही रुळले आहेत. फराळ हा केवळ दिवाळीच्या आनंदाचा उपचार नाही. तो खाद्यसंस्कृतीचा ठेवा आहे. हा ठेवा समृद्ध करणारे पदार्थ मग या मातीतले असोत अथवा नसोत या पदार्थानी वर्षानुवर्षे आपल्या दिवाळीच्या आनंदात भर टाकत आपली दिवाळी खमंग आणि खुसखुशीत नक्कीच केली आहे.
दिवाळीत मस्त खा…स्वस्थ रहा..
हो पण… कोरोनाचे नियम पाळा…
सौ. आरती धर्माधिकारी
(नेरूळ) नवी मुंबई