नवी दिल्ली : ग्राहकांसह विविध संस्थांना येत्या डिसेंबरपासून २४ तासात कोणत्याही क्षणी रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवता येणार आहे. त्यासाठी ‘रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ अर्थात आरटीजीएस ची सेवा २४ तास सुरू करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
या निर्णयानुसार आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही सेवा डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहे. नोटाबंदीनंतर रोकड व्यवहारांऐवजी ग्राहकांनी ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारांना पसंती दिली होती. मात्र त्यानंतर बाजारातील रोख व्यवहारांमध्ये वाढ होत हाेती.
त्यानंतर आरबीआयने डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देत ‘एनईएफटी’ सेवा २४ तास उपलब्ध केली. आज ‘आरटीजीएस’देखील डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास उपलब्ध करण्याची घोषणा केली.
नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएसचा पर्याय वापरून ज्यांना पैसे हस्तांतर करायचे आहेत त्या व्यक्तीचा खाते क्रमांक, बॅंक कोड देऊन पैसे पाठवता येतात. या प्रणालीत वेळेनुसार शुल्क वाढत जाते. ज्यात सकाळच्या सत्रात कमी शुल्क असते नंतर ते तासागणीक वाढत जाते. किमान २ लाख रुपये ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून पाठवता येतात. पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा नाही मात्र बँकांकडून १० लाखांपर्यंत हस्तांतर करण्यास परवानगी आहे.