१४ मार्च २०२०.. स्थळ दिल्लीतील केंद्रस्थानी…. वेळ अशीच नेहमीची.. आणि मन की बात सुरू होते. मन की बात मध्ये सांगितले जाते कोरोना मुळे देशावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. आणि पाहता पाहता रेल्वे, बस, विमाने, दुकाने, शाळा महाविद्यालये, बगिचे, मंदिरे, बाजारपेठांना पटापटा कुलूपे लागु लागली.
असा कोण लागून गेलाय हा कोरोना का फरोना… आम्ही शुर सरदार आम्हाला काय कोणाची भिती . आम्ही त्या नापाकला घाबरत नाही तर हा कोण कोरोना. पण जेव्हा मागील भागावर पोलिसदादांची प्यारी बसली नी मागील भाग चांगलाच लाल होत सुजला तेव्हा मात्र आम्ही सर्वच लॉक झालोत. तरीही छुपेछुपे बाहेर पडतच होतो. पण जेव्हा हा कोरोना घराजवळ आला तेव्हा मात्र आम्हीही घाबरू लागलो. त्यामुळे घरात गमगुमान बसलो. पण बसून बसून तरी किती हो बसणार…. घरातील प्रत्येक सदस्य आता ऐकमेकांना हे करा, ते करा असे सांगता सांगता मित्रपरिवारालाही सांगु लागलो.
आम्ही आज हे केले, आम्ही आज ते केले. या करण्या- करण्यातून सर्वामध्ये चांगलीच स्पर्धा नी इर्षा सुरू झाली. काहीही असो या ‘कोरोना’मुळे अनेकजण ‘करो ना ’कर्ते झालेत . बायकांसोबत चक्क पुरूषही पाकगृहात पाककला शिकू लागले हेही थोडके नसे. (अपावाद वगळता) . कोरोना काळात कोणी कोणी काय काय केले याचा रनिंग (धावता) आढावा घेतलाय राज्याच्या राजधानीतून आरती धर्माधिकारी यांनी….
(सूचना : हा धावता आढावा घरातूनच ऑनलाईन पध्दतीने आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून घेतला असल्याने वाचण्यास सेफ आहे. चिंता नसावी.) तर मग वाचाच… कोरोना ते करो ना ….
(दोन सूचना : १) अनेकांच्या घरात डोकावून चित्रण करण्यात आले आहे. कृपया कोणाशी याचा संबंध आढळून आला तर तो योगायोग समजावा.२) अरे हे तर आमच्याच घरातील चित्रण केलयं असे म्हणून जाेराने टाळ्या वाजवू नका. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे हे लक्षात ठेवावे. कोरोना कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. दुसरी तीसरी लाट येणारच आहे. असे दिल्लीहून सांगण्यात आले आहे.)
करोना…… करोना….. करोना होऊ नये म्हणून वाफळलले खाऊन, वाफ घेऊन तोंड भाजून, पण शरीराची काळजी घेऊ ना, अशी मार्च महिन्यापासून सुरु झालेली स्थिती आजपर्यंत तशीच आहे, आणि पुढे किती दिवस राहणार याची ‘कल्पना तुम करोना ‘
सध्या क्या चल रहा है? तर लोक फॉग नही, कोरोना वायरस… वायरस म्हणायला लागले आहेत. मित्र- राजनैतिक मुद्दे गायब झाले आहे आणि करोनाच्या चर्चेला उधाण आले आहे.
पण सगळीदूर हाच विषय वाचून, ऐकून, चर्चा करुन कंटाळला असला तरी कोरोना है त्यामुळे करो ना … चला तर मग आज या करोनाला थोडस मजेच रुप देऊ या… आणि मनभरुन हसू या…..
सोशल मिडिया वर तर चल रहे… सौ जायो दोस्तों सुबह जल्दी उठकर फिर आराम भी करना है,
बाहेर पोलिसांचे दंडे आणि घरात बायकोची बडबड, चीनी लोकानो तुला क्षमा करणार नाही हिंदुस्थान, असे, जोक तयार झालेत. आणि मायूस झालेल्या चेह-यावर आनंदाची लहर आली.
मग काही दिवसांनी या चर्चेला अजून उधाण आले. ५ च्या स्पीड वर फॅन बंद केल्यानंतर १ मिनिट ६ सेकंदांनी पूर्ण फिरायाचा थांबतो, घरात बसण्याचा चौथा दिवस, अभ्यास चालू , मारी बिस्कीट मध्ये २२ छिद्रे असतात, १ किलो गव्हामध्ये ८,७९० दाणे असतात, उद्या तांदळाचे सांगतो, पुढे तर, अश्या जोकचा कहर झाला, आता कसं वाटतंय??
रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखे वाटतंय फक्त टॉयलेटला जायचे आणि परत आपल्या जागेवर येऊन बसायचे,
एवढ्यावरती लोक थांबली नाही तर, टिव्हीच्या मालिकेवरुनही लोंक बोलायला लागली आणि थोडक्यात
आपली अक्कल दाखवायला लागले.
पूर्वी रामायण लागलं की रस्ते ओस पडायचे, आता रस्ते ओस आहेत म्हणून रामायण लागणार आहे.
(रिश्ता वही सोच नयी)
एकाने तर कहरच केला लॉकडाऊन स्थितीमध्ये घरात आनंदी वातावरण कायम ठेवण्याकरीता
अमृतावचनांची नोंदच केली.
१. तू आज खूप छान दिसत आहेत – १० वेळा
२. किती काम पडतं ना तुला – ६ वेळा
३. खूप बारीक वाटू लागली आहे तू. – २० वेळा
४. खूप थकतेस ना – १० वेळा
५. स्वत:ची काळजी घे – १५ वेळा
६. तुझ्या घरचे किती चांगले आहेत – कमीत कमी १०० वेळा
ह्या अमृत वचनांचं पठण करा व बघा घरात किती सुख शांती नांदते व कुठलंही काम करावं लागणार नाही.
‘मस्त खा… स्वस्थ राहा’
त्यानंतर तर कहर झाला या मस्त खा आणि स्वस्थ राहा ने. मोदीनी पुढच्या मन की बातच्या भाषणात म्हणतील , ‘मे रे .. प्या….रे….. हाथींयो. हे सुध्दा लोकांनीच ठरवंल.
शेवटी तर इतकं झालं की लोक म्हणायला लागली ‘कोरोना घराला घरपण देणारा व्हायरस ॥’
खरच मार्च महिन्यापासून आपण असे जोक्स वाचतो आहे. हसतो, खातो, मजा करतो आहे. काही जण ऑनलाईन योगा, फूड क्लासेस , Music Classes आतातरी शाळाही सुरु झाल्या आहे. हे संगळ करतो आहे
पण खोलवर मनात कोठेतरी, सतत भिती आहे. हा जावा म्हणून गणपतीला साकड घातलं, देवीला साकड घालायच, परत पूर्वींचे दिवस येऊ दे….. नक्की येतील. आपली आपली समजूत हं.
फक्त वाट पाहावी लागेल…(सबर का फल मिठा होता है ) आणि विसरुन चालणार नाही म्हणून मला इथे प्रविण त्रिपाठीची कविता आठवतेय…
रखो स्वच्छता अब किसी से डरना।
बिना काम के आप घूमो फिरो ना ।
सुरक्षा सदा प्राथमिक कार्य हो अब ।
हे झाले कोरोना पण ते करो ना म्हणजे काय ?
दैनंदिन आयुष्यात घ्यायची काळजी घेणे. स्वतःचे संरक्षण कसे कराल? श्वसनाच्या संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे कसे संरक्षण करता येईल हे सांगितले आहे.
यात हात कसे स्वच्छ ठेवावे, चेहरा झाकणारा मास्क कसा वापरावा, शिंकताना घ्यायची काळजी
हात साफ ठेवण्यासाठी अल्कोहोल असलेले हॅन्ड सॅनिटीझरचा वापर
कोरोना प्रकारचे विषाणूंना एक बाहेरील मेदाचे किंवा फॅटचे आवरण असते आणि आत त्यांचा जीनोम असतो. विषाणूचा जीनोम आरएनएचा (RNA) बनलेला असतो. मेदाच्या आवरणामुळे हा विषाणू अल्कोहोल असलेली किंवा ब्लीच असलेली जंतुनाशके वापरून हा विषाणू नष्ट करता येतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO ) नुसार अल्कोहोल असलेला हॅन्ड सॅनिटायझर्स हात साफ करायला वापरले पाहिजेत.
यात 60%-80% अल्कोहोल असणे आवश्यक आहे. यामुळे जीवाणू नष्ट होतात किंवा त्यांची वाढ थांबते. अल्कोहोल असलेला हॅन्ड सॅनिटीझर्स कसे वापराल : सॅनिटायझरच्या बाटलीच्या तोंडाला हात न लावता हाताच्या तळव्यावर पुरेसे सॅनिटीझर घ्या.
सॅनिटायझर पूर्ण हातावर पसरेल अशा पद्धतीने हात निदान वीस सेकंड किंवा सॅनिटायझर वाळेपर्यंत लावा.
अल्कोहोल असलेला हॅन्ड सॅनिटायझर्स कधी वापराल:
कोणत्याही रुग्णाला भेटायच्या आधी किंवा भेटल्यानंतर
दरवाज्याची काडी, बेल, लिफ्टनमधील बटणे, दिव्याची बटणे यासारख्या वस्तूंना हात लावल्यावर.
मध्ये अंतर सोडा.
तुमच्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये शक्यतो दोन मीटर आणि
कमीतकमी एक मीटर अंतर सोडा.
(वाटलंच….. कोणाकोणाला तो सोडा वाटला. दिसतोय ना.. दिसतोय.. मुखकमलावर आणि हृदयकमलात कशा गुदगुदल्या होताय. पण क्षणभरच हं. कारण लॉकडाऊन सुरू आहे. सोडा दुकान नी ते पण कुलूपबंद आहे. आपापल्या साै . च्या सूचना.)
सध्याच्या माहितीनुसार सार्स-कोव्ह-2 विषाणू खोकताना किंवा शिंकताना निर्माण झालेल्या थेंबांमुळे पसरतो. श्वासोत्च्छवासामुळे हा विषाणू पसरत नसावा असे उपलब्ध माहितीवरून वाटते. हा विषाणूचा साईझ किंवा आकारमान 100 नॅनोमीटर इतके आहे (म्हणजे मिलीमीटरपेक्षा 10000पट लहान).
पण विषाणू इतकाही लहान नाही की हवेमध्ये तरंगत राहील. म्हणून हा विषाणू थेंबांमधून पसरू शकतो, श्वासामधून नाही, असे मानले जाते. असे थेंब पडलेल्या पृष्ठभागाला हात लावला आणि त्यानंतर चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावला तर विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
म्हणून पुढील काळजी घ्या :
कोणी भेटल्यास (इंग्राजळलेल्यानुसार हस्तांदोलन करू नका, तर भारतीय पध्दतीचा पुर्ण हात जोडून नमस्कार करा.
शक्यतो इतरांपासून दोन मीटर किंवा सहा फूट अंतर ठेवा.
जर अंतर ठेवणे शक्य नसेल तेव्हा मास्क घालून चेहरा झाका.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन ड मिळवण्यासाठी प्रयत्न करा.
व्हिटॅमिन ड मुळे विषाणूपासून संरक्षण मिळत नाही पण आजारपण टाळण्यासाठी आणि आजारी पडल्यावर लवकर बरे होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्धा तास उन्हात घालवल्यास पुरेसे
व्हिटॅमिन ड अगदी मोफत मिळते. (त्यासाठी कोठेही जाऊ नका.आपापल्या घराच्या छतावर जाता येईल.)
पुरेशी झोप घ्या रोज 7-9 तास झोप घ्या. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि इतर क्रिया योग्य प्रकारे कार्य करतात.
रोज व्यायाम करा. (हे ऐकले नी काय नोकरदार, विद्यार्थी, कॉलेजकुमार प्रथम सत्रात ७ अधिक ७ आणि ९ अधिक ९ अशी झोप घेतली)
सध्या जिममध्ये जाऊन व्यायाम करणे योग्य नाही. पण घरातल्या घरात अनेक प्रकारचे व्यायाम करता येतात, जसे दोरीवरच्या उड्या मारणे, पुश-अप, योगासने इत्यादी. व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरिरामधील इन्फ्लमेशन (inflammation) कमी होते.
ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
( त्यासाठी प्रथम मदिरालये सुरू करण्याची सूचनाही काहींनी केली होती. आम्हाला त्यांची नावे पूराव्यानिशी माहित आहेत. योग्य वेळ येतातच ती जाहिर करण्यास मागे …. नको….खाकीच्या दांडीची आठवण येते. म्हणून पुढे जाहिर करण्यास पुढे पुढे करणार नाही. हे इसरू नका. कोरोना देवी तू जाशील का घरी. : मदिरालयातील एका भक्त)
मनावरचा ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासने करा. मनावर ताण जितका जास्त तितकी ताणामुळे स्त्रवणारी संप्रेरके जास्त प्रमाणात बनतात. या संप्रेरकांमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
संतुलित आहार घ्या ( वैद्यकीय नी योग गुरूंचा आनंद )
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या. यासाठी आहारात व्हिटॅमिन क असलेली फळे (संत्री, मोसंबी, पेरू ), आले, हळद, तुळशीची पाने, झिंक सप्लिमेंट इत्यादीचा वापर करा.
अशाप्रकारे आपण कोरोनाला लांब ठेवू शकतो.
तरीही एक गोष्ट प्रकर्षाने प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते कोरोना अजून आपल्या आजूबाजूलाच असला तरी त्याच्या विरुध्द लढता लढता आपल्याला माणुसकीची लढाई जिंकायची आहे. निसर्गाने आपल्याला जगण्याच्या पध्दती मध्ये आमुलाग्र बदल करण्याची संधी दिली आहे. पण सरधोपट मार्गावर चालण्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की वेगळं काही सुचत नाही आणि कोणी जाणीव करुन दिली तर रुचत नाही. मनात नवीन परिस्थिती बरोबर जुळवून घेण्याची भिती वाटते. विशिष्ट चौकटी बाहेर जाण्याचे कष्ट नकोसे वाटतात. अशा विचारांमुळे आपली प्रगती खुंटते.
आपट्याची पाने वाटून विजयाचा खोटा आव आपण किती दिवस मिरविणार ?…
ताण, राग, निराशा, भिती, चिंता, बेचैनी यावर मात करण्यासाठी विविध छंद आणि कला यांचा आधार शोधला तर…
आखीव रेखीव चौकटीतून बाहेर पडणे अवघड आहे . पण अशक्य नक्कीच नाही. एकदा अनवट वाटा शोधायला लागलं की आनंदाचा जिवंत झरा सापडतो. आपल्या क्षमतांच्या कक्षा विस्तारुन आयुष्याच्या नवीन वाटा शोधू यात……आनंद-समाधानाच्या आड आलेल्या सर्व सीमा पार करुन आत्मविश्वास जागवू यात!!
आणि या आत्मभानाचा – आनंदाचा प्रकाश पुढच्या पिढीच्या हाती देऊ यात….आयुष्यभरासाठी माणुसकीच्या जीवावर आलेल संकट दूर कर माते… आणि जुने ते दिवस लवकर परत आण माते!!!
जय कोरोना माते, तुम्ही घ्यावा निरोप आता
आम्हा पामरांना आता , बाहरेचा मोकळा श्वास घेवू द्या की जरा
जय माते कोरोना माते, मास्क आम्ही लावू, अंतर आम्ही ठेवू
उतणार नाही, मातणार नाही, मास्क तोंडावरचा आम्ही काढणार नाही.
करू तुझे विसर्जन, होईल आमचे रक्षण
जय देवी कोरोना देवी, पुरूष मंडळी घरात करतील गुमान कामे
दिवसभर व्हॉटसॲप नी फेसबुक नी यु ट्युबशी जोडू नाते
जय देवी जय देवी कोरोना माते ,जवकर जावे तु अपुल्या सासरी
नाही नाही म्हणता घेतलास आमचाच पाहुणचार
आता तरी पुरे कर कोरोना माते, करो ना… करो ना चा मंत्र ठेवू हृदयी
( हा जयघोष सर्वांनी मनातल्या मनात करायचा आहे. कोणीही घराच्या छतावर, रस्त्यावर थाळ्या घेवून उत्सव साजरा करू नये. असे केल्याने कोरोना देवीचा मुक्काम तुमच्याकडे किंवा आमच्या कडे वाढू शकतो, याची नोंद घ्यावी. चला जयघोष करा )
मास्क आम्ही घालू, डिस्टन्स सोशल ठेवू
कोरोना देवीला सासरी आम्ही सासरी पाठवू.
(जय घोष संपला आहे टाळ्या वाजवून ध्वनी प्रदूषण करू नका)
(हा लेख फक्त मनाेरंजनासाठी आहे.)
सौ आरती राजेश धर्माधिकारी
नेरुळ, नवी मुंबई