मुंबई : सोडून गेलेल्यांना परत घरात प्रवेश नाही असे ठणकावून सांगणार्या शरदराव पवारांनी नाथाभाऊंना उगीच पक्षात घेतले नसेल. त्यामागे त्यांची राजकीय गणिते असतील, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आज दुपारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. नाथाभाऊं आणि शरदराव पवार हे राजकारणातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यामुळे नाथाभाऊंना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे कोणती तरी राजकीय गणिते आहेत. एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला.
शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं.
इतका कठोर निर्णय़ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपामधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात”. असेही खा, संजय राऊत यांनी सांगितले.