भारत कृषीप्रधान असला तरी कृषीला कमी प्राधान्य दिले जातयं. . अनेक सरकारे आलीत आणि गेलीत. येतील आणि जातीलही. मात्र एक राजा नाही बदलला. त्याने त्याच्या प्रजेवर जीवापाड प्रेम केल.
फाटलेल्या त्या आभाळानं आणि राज्यकर्त्यांन त्याला नागवल, छळल, पिळल. मात्र हा गड्या लय बेरीकी. मरून मरून जगतोय….. कशासाठी… कोणासाठी…. गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, विमानवारी साठी का ?
नाही… तो जगतोय.. तो जगतोय. .. कारण तो लाखोचा पोशिंदा आहे म्हणून…. उतला नाही, मातला नाही… घेतला वसा टाकला नाही…. आभाळातल्या त्या देवानं दिलेले काम तो गळ्याला फास लावत करतोय…. कारण तो लाखोंचा पोशिंदा आहे …
हे साध गणित राज्यकर्त्यांना जमू नये…..हे कसले राज्याचे रक्षणकर्ते…. हे कसले जनतेचे उध्दारकर्ते….. यांनीच तर या धरतीच्या राजाचा बळी दिलाय…. कृषीला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज आहे. हेच काहीसे सांगताहेत जळगावचे नवोदित युवा कवी विवेक चौधरी…
धरतीच्या लेकराला कसं आभाळ नडलं..
होतं सपान येगळ सारं इपरित घडलं..
होती कष्टाची पावती , सारी उभी शेतामधी..
आलं आभाळाच्या मनी, उभं पाणी डोळ्यामधी..
शेत पाण्यात भिजलं , मन जागीच थिजलं..
रान सपनाच उभं, एका क्षणात विझलं..
कधी बाजारात धाक , काय मिळेल हो दाम..
पेरी मोत्याचं बियाणं, वाही अनमोल घाम..
कर्ज व्याजनं ते काढी , रानी हिरवळ शृंगारी..
व्याज फेडी दर साली, तरी फिटेना उधारी..
दरसाली पेरतो , नव्या सपनाच बियाणं..
तरी भरेना घरात, कधी खरं सोनं नाणं..
दिस सणाचे हे आले, देवा आता उंबऱ्यावर..
करी उपकार थोडे ,जगाच्या पोशिंद्यावर..
थोडी उसंत जगण्याची,त्याच्या नशिबी मिळू दे..
सपनं छोटी छोटी त्याची, थोडी झळाळी मिळू दे..
सण दिवाळीचे दीप, त्याच्या घरिबी उजळू दे..
पीक जोमात येऊ दे , भाव सोन्याचा मिळू दे..
नावं आहे बळीराजा, मान राजाचा मिळू दे..
दरबारी जनावरं पीक,आभाळी भिडू दे..
…. विवेक श्रावण चौधरी जळगाव