वाचनीय

क... कवितेचा : काळी माती

दिवाळी विशेष २०२०
November 12, 2020

शेती, पाणी आणि शेतकरी हे आपल्या जीवनाचे अविभाज़्य भाग असले तरी शेतकर्‍याच्या कष्टांचे महत्व समजून घेता येत नाही. शेतकरी शेतात राबराबून जीवनाचे सोने पिकवत असतो, की जे आपल्यासारख्या नोकरदारांना जीवन जगवत असते. तसे आपलेही या मातीशी नाते आहेच.
अशाच या मातीची आणि शेतकर्‍याच्या कष्टाची महती सांगणारी कविता शब्दबध्द केलीय धरणगाव तालुक्यातील मुसळीचे शेतकरी कवी शरद पाटील यांनी…

आता हंगाम संपून शेत नांगरलं
चैत्र वैशाखाचं उन त्यात ढेकाळं तापलं
तप्त उन्हाने लाही लाही होई आता
शेतकरी राजाचं अंग प्रत्यांग घामात न्हालं ॥1॥


वैशाखा संगे जेष्ठ संपत येतांना
नभी ढगा संगे वादळ धावून आलं
पहिल्या या पावसाने घनघोर बरसत
काळ्या मातीला सुगंधाने बहरवलं ॥2॥


आता शेतकरी माझा राजाच्या
डोळ्यात हिरवं स्वप्नं समावलं
तिफन शंकर होवून हाकतांना
पार्वतीरूपी अर्धांगिनीनं पेरलं ॥3॥


धरणी पोटांत बी समावले आता
पिकं काळ्या धरणीत अंकुरून आलं
आवंदा मोत्याची रास पिको म्हणत
मन मनात समाधानी होवून आनंदी झालं ॥4॥


गोतावळा त्याचा बैल, गुरा-ढोरांचा
पशु-पक्षांसोबत शेतात रोज चाले गलबलं
दाणे रूपी मोती कणसात झुलून गेले
पक्षांनी कणीस चाखतांना जणू चुंबण घेतलं ॥5॥


करून इमाने इतबारे शेती
लाभे कष्टाला धरणीच मोठ मोलं
शेतीवरच त्याचा संसार चाले सारा
आत्मबळ त्याच्या असे अंगातलं ॥6॥


आशी काळी आई शेती त्याची
तिनं भरभरून धनधान्य दिलं
मुक्तकंठाने तीच गुणगाणं करत म्हणे
तुझ्यासेवेत आयुष्य सारं माझं वाहीलं ॥7॥

शरद एम पाटील,
मुसळी जि. जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts