वाचनीय

का साजरा केला जातो आजच्या दिवशी जागतीक पुस्तक दिन....

ताज्या घडामोडी, ब्लॉग
April 23, 2021

आज २३ एप्रिल, अर्थात जागतीक पुस्तक दिन. पुस्तकांना गुरू म्हटले जाते. मानवाच्या आयुष्यात चार गुरू येत असतात. पहिला गुरू म्हणजे त्याची जन्मदात्री आई, दुसरा गुरू म्हणजे पुस्तक , तिसरा गुरू म्हणजे हे पुस्तकी ज्ञान शिकवणारे शिक्षक आणि चौथा गुरू म्हणजे जगातील वास्तवात कसे जगावे हे शिकवणारे अनेक गुरू. आई या गुरूला पर्याय होऊच शकत नाही. किंवा त्याचे महत्त्वही कधीच कमी होऊ शकत नाही.

आई या गुरूकडून मातृशिक्षण घेतल्यानंतरचा सर्वात मोठा गुरू म्हणजे पुस्तके होत. ही पुस्तके त्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात. त्याला सुख कसे पचवायचे आणि दु:ख कसे सहन करायचे हे शिकवत असतात. म्हणूनच मानवाच्या आयुष्यात पुस्तकांचे महत्त्व त्रिकालबाधित आहे. अशी पुस्तके लिहिलेल्या एका प्रसिध्द लेखकाचा जन्म दिवस म्हणून जागतीक स्तरावर आजचा पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. काय आहे कहाणी त्यामागीच वाचाच….

तो जगप्रसिध्द लेखक आहे. त्याच्या जन्म-मृत्यूबाबत आणि गावांबाबत योगायोग म्हणावा की नियतीची काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणावी लागेल. कारण त्यांचा जन्म 23 एप्रिल 1564 रोजी झाला तर मृत्यू ही 23 एप्रिल 1616 रोजी झाला. एवढेच नव्हे तर त्याचे जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग फक्त या लेखकाच्या बाबतीत दिसून आला आहे.


या लेखकाच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे.


लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. 38 नाटकं व 154 कविता ही त्यांची लेखन संपदा. 38 नाटकांपैकी 10 नाटके ऐतिहासिक ,16 नाटके सुखात्मक व 12 नाटकं शोकात्मक. त्याच्या साहित्य संपदेचं वैशिष्ट्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत अनेक भाषेत चित्रपट व नाटके रंगभूमीवर सादर झालेली आहेत. रोमिओ आणि ज्यूलिएट ही तर अजरामर प्रेमकहानी .

आजही प्रेमाचं वारं पिऊन भरार भरारी स्वप्न रंगवणा-या तरुण तरूणीला लोकं रोमिओ-ज्यूलिएट असं म्हणतात. कोवळ्या वयात रंगवलेले प्रेमाचे कथानक व दुर्दैवी अंत हे या नाटकाचे सूत्र लोकांना इतकं भावलं की चारशे वर्षानंतरही तीच भावना जगाच्या पाठीवर मानवी भेदाच्या सर्व पाय-या ओलांडून मनामनात कायम आहे.

अन् त्याचं अमरत्व इतकं अबाधित आहे की ,सृष्टीवर मानवी अंश असेपर्यंत प्रेमातला संघर्ष व त्यातली ओढ रोमिओ-ज्यूलिएटनेच अधोरेखित होणार आहे. हॅम्लेट, किंग लिअर, मक्बेथ, अॅथेल्लो ही नाटकेही अशीच मानवी जीवनातील कटकारस्थाने, घातपात, विश्वासघात व प्रेम ,सत्य अशा मूल्यांतील पराकोटीचा संघर्ष पेरणारी.


जगावं की मरावं ? That is the question. हा प्रश्न सातासमुद्रापल्याडच्या सर्वच रंगभूमीवर शेक्सपिअरने नेला. याला म्हणतात प्रतिभेचं अमरत्व.

कोण असेल बरे हो महान लेखक ? असा प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल ना ? तर
त्या लेखकाच नाव आहे शेक्सपिअर. आठवलं ना.


वाचाल तर वाचाल

असे म्हणतात की वाचाल तर वाचाल. खरं आहे ते. वाचनाशी माणसाची मैत्री असावी. मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपूल साहित्यसंपदा उपलब्ध आहे.


वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकरांपासून तर आज पर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंत…रविन्द्रनाथ टागोरापासून गुलजारसाहेबांपर्यंत..


कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथासारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत…

लिहणारे लिहीत जावे…
वाचणा-याने वाचत जावे
कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे


इतकं सुंदर आहे हे वाचणं.


वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात.


माझ्याकडे इतकी संपत्ती ,इतका जमीनजुमला आहे. असले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
वाचनाने विचार आणि वाचा यांत प्रगल्भता येते.


म्हणून वाचाल तर वाचाल, समृद्धीपणे जगाल
आज आपल्याला कोरोनासारख्या रोगाने दाखवून दिलय. माणसाच्या बेसिक गरजा अत्यंत थोड्या असतात…
आतातरी आपण विचारांनी समृद्ध होऊ , पुस्तक वाचू, जीवन समृध्द करु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts