वाचनीय

अरेच्च्या हे असेही होऊ शकते ! लसीकरण केंद्रावरील रांगेतच जुळले मन आता म्हणत आहेत आमच्यासोबत मुलांपण द्या ...

ब्लॉग
May 8, 2021

एका युवकाचे प्रयत्न करूनही विवाह जुळत नव्हता. मात्र तो विवाह कोविड लसीकरण केद्रावर रांगेत उभे राहील्याने जुळल्याचा अनुभव एका युवकाने शेअर करत सरकारचे आभार मानले आहे. या आभारासोबत त्याने एक मागणी केली आहे. म्हटले तर मागणी तशी किरकोळ असली तरी सध्याच्या स्थितीत ती हुंड्यापेक्षाही महाग झाली आहे. काय आहे प्रकरण… त्यासाठी ही पोस्ट तर तुम्ही वाचलीच पाहिजे.

होय, कोविडची लस घेण्यासाठी केंद्रांवर लांबलचक रांगा लागत आहेत. लस घेण्यासाठी पहाटे ३ वाजेपासून रांगा लागत आहेत. अशा रांगेत तासन तास उभे राहूनच काही जणांची मने आणि लग्नदेखील जुळत आहेत. त्यामुळे लग्न जुळवण्यासाठी पालकांचा होणारा त्रास आता कमी झाला आहे.

लस घेण्यासाठी लांबलचक रांगा लागत असल्याने नंबर येईपर्यत लस संपत असल्याने पुन्हा सेंकड डेला रांगेत नंबर लावावा लागत आहे. याबाबतचा एक अनुभव एका युवकाने शेअर केला आहे. काय म्हणतो तो युवक .. वाचाच….


पोस्टमध्ये तो युवक म्हणतो , एक मेपासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना कोरोनावरील लस देण्याच्या क्रांतिकारक निर्णयामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच. शिवाय अनेकांची लग्ने ठरून, त्यांचे संसारही मार्गी लागतील, असे चित्र दिसत आहे. अनेक युवक युवती लस घेण्यासाठी केंद्रावर तासन तास उभे राहत आहेत.


मीदेखील त्यापैकीच एक आहे. लसीकरणाच्या रांगेत उभे राहून, मला अद्याप लस मिळाली नाही. मात्र, सरकारच्या या उपक्रमामुळे कित्येक वर्षे रखडलेले त्याचे लग्न जुळले. त्याबद्दल तो केंद्र सरकार व राज्य सरकारचे आभार मानत आहे.


तो म्हणतो या निर्णयामुळे त्याचे लग्न जुळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानलेच पाहिजे. आभार मानले नाहीत तर तो मोठा कृतघ्नपणा ठरेल आणि तो कृतघ्नपणा तो करणार नाही. नक्कीच करणार नाही.

आणि असे जुळले त्याचे लग्न…

सरकारने १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अॅपवर नोंदणी केली व एक मे रोजी सकाळी सातलाच रांगेत उभे राहिलो. थोड्यावेळाने एक सुंदर मुलगी माझ्यामागे उभी राहिली. तासभर आम्ही निमूटपणे उभे होतो. मात्र, रांगेत उभे राहून राहून कंटाळा आला.

मग आठच्या सुमारास आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. नऊला एकमेकांचे नाव-गाव विचारले. दहापर्यंत आमची पुरेशी ओळख झाली. तिचे नाव प्रिया होते. बारापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली.

दुपारी एकला लशींचा साठा संपल्याने लसीकरण थांबवत असल्याचे कर्मचाऱ्यांनी जाहीर केले व दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितले. यावर रांगेतील सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मात्र, उद्या पुन्हा बोलावल्याचा आम्हा दोघांना आनंद झाला.


दुसऱ्या दिवशी सकाळी सातला मी कडक इस्रीचे कपडे, पॉलिश केलेले बूट व ब्रॅंडेड सेंट फवारून रांगेत उभा राहिलो. प्रियादेखील आज खूपच सजून आली होती. तिला पाहताच माझ्या ह्रदयाची तार झंकारली. मग आमच्या गप्पा रंगल्या. नऊ वाजता आम्ही लग्न कसे करायचे, यावर बोलू लागलो. लग्नासाठी दोनच तास असल्याने त्या वेळेत काय काय करायचं, हे दहा वाजता ठरवू लागलो.

लग्नाला कोणा-कोणाला बोलवायचे याची यादी आम्ही एकपर्यंत काढली. तेवढ्यात कर्मचाऱ्याने लस संपल्याचे जाहीर केले. मग रांगेतील अनेकांनी वाद घातला. आम्ही मात्र हसतमुखाने एकमेकांना निरोप दिला. तिसऱ्या दिवशी आम्ही दोघेही वेळेच्या आधीच रांगेत उभे राहिलो. आज आम्ही हनिमूनला कोठे जायचे, यावर चर्चा केली. लग्नानंतर कोठे राहायचे, आर्थिक नियोजन कसे करायचे, हे ठरवण्यातच आमचा वेळ गेला.


चौथ्या दिवशी आम्ही साडेसहाला आलो. आज आम्ही मुलांना काय शिकवायचे यावर चर्चा केली. मुलीला डॉक्टर व मुलाला इंजिनिअर करायचे हे ठरवले. खरं तर सहाव्या दिवशी आमचे लग्न होते. तरीही आम्ही रांगेत उभे राहिलो व दोन तासात लग्न उरकायचे असल्याने त्याचे नियोजन करत बसलो. लस संपल्यानंतर तसेच आम्ही विवाहस्थळ गाठले. साहेब, लसीकरणासाठी रांगेत उभे राहायला लागते, याची माहिती आमच्या घरच्यांना होती.

त्यामुळे आमच्या दोघांवर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी एक-दोनपर्यंत आम्ही एकत्रित वेळ काढू शकलो. रांगेमुळेच आमचे प्रेम जमले व ते यशस्वीही ठरले. याबद्दल शासनाचे खूप खूप आभार.

पण सरकार, अजूनही आम्हाला लस मिळाली नाही. आम्ही आई-बाबा होण्याच्या आत ती मिळावी, एवढी विनंती. नाहीतर आम्ही दोघे मुलांसह लस घेण्यासाठी रांगेत उभे आहोत, हे दृश्य दिसायला नको म्हणजे मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts